जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ भरीव मदत द्या… — काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

      पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज

         दखल न्यूज भारत

देसाईगंज जुलै महिण्यात संततधार पाऊस पडत असुन यामुळे नदी नाले फुगले आहेत.नदी नाल्यांच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे.

            जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांची एकुणच आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने अधिक अडचणीत येण्याची दाट शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूरांसह नुकसानग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

    मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.दरम्यान स्थानिक महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतपिकाची मोका चौकशी करून तसा अहवाल शासनास सादर केला आहे.एक रुपयात शासनाची पिक विमा योजना लागू असतांना शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही.

    मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीतुन येथील शेतकरी,शेतमजूर सावरत नाही तोच बँकेकडुन पिक कर्ज काढून तसेच हात उसणवारी रक्कम घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी,रोवणी केली होती.

            मात्र जुलै महिण्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुन व वैनगंगा नदीला धरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत.अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.

      त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहु जाता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ भरीव मदत देण्यासह मागील वर्षी अतिवृष्टी,वैनगंगा नदीला आलेला पुर व त्यानंतर झालेला रोगाचा प्रादुर्भाव,या संदर्भात करण्यात आलेल्या मोका चौकशीच्या आधारे थकीत नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी काँग्रेस नेत्या डाॅ. शिलु चिमुरकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.