दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर नदीतील पाण्यावर तवंग आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांडपाणी, औद्याोगिक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. इंद्रायणी भीमाला मिळते आणि भीमा पंढरपुरातील चंद्रभागेला मिळते. त्यामुळे तिन्ही नद्या प्रदूषित होतात. आळंदी ग्रामस्थ, देवस्थान आणि नदी प्रदूषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची एक समिती स्थापन करावी. दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा अशी मागणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी महाराज यांनी केली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा चार दिवसांवर आला असताना आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषण, रसायनमिश्रीत पाण्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग पाच दिवसांपासून नदीतील पाण्यावर तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्याोगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे व वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत प्रशासन उदासीन दिसते. कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यानही नदीतील पाण्यावर तवंग आला होता. कोणत्या भागातून सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत वारकरी संप्रदायाने व सामाजिक पर्यावरण विषयक संघटनानी प्रशासनाला माहिती दिली होती. पण, कोणतीही उपाययोजना झाली नसल्याची खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथजी महाराज यांनी व्यक्त केली.