या भारतभूमीवर अनेक राजे महात्मे होवून गेले. प्रत्येकांनीच आपली एक विशेषतः ठेवून कारकीर्द गाजवली. त्याच माध्यमातून त्यांना ऐतिहासिक झळाळी लाभली. त्यापैकी एक लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज होय. राजर्षी शाहूमहाराजांची एक विशेषतः म्हणजे त्यांना शिक्षणाविषयी अतिशय प्रेम होते. जीवनातील वैभवाचे मूळ म्हणजे शिक्षण होय. तसेच जीवनातील अंधार दूर करणारा सूर्य म्हणजे शिक्षण होय.असे ते समजायचे.
आज राजर्षी शाहू महाराज यांची आपण जयंती साजरी करीत आहोत.त्यानिमित्त त्यांचे शैक्षणिक विचार आपल्या समोर मांडीत आहे.
राजर्षी शाहु महाराज लोकहित, समाजहित, राष्ट्रहित जपणारे राजे होते. त्यांना माहित होते समाजाचे परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर अगोदर समाज शिक्षित असणे गरजेचे आहे. कारण अविद्या हेच सर्व दारिद्रयाचे मूळ आहे. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकाचा प्रभाव होता. म्हणून त्यांनी शैक्षणिक चळवळ घडवून आणली.
राजर्षींनी १८९४ ते १९२२ अठ्ठावीस वर्षे राज्याधिकार सांभाळले.या काळात शैक्षणिक चळवळ समाजाच्या तळागाळापर्यंत कशी रुजवता येईल. याचा अभ्यास केला.आणि शैक्षणिक धोरणात्मक उपक्रम राबवून सर्वप्रथम प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर अधिक लक्ष पुरविले. प्राथमिक तयारी खेरीज पुढील शैक्षणिक प्रगती अशक्य आहे. हे त्यांनी जाणले होते.
समाजाने शिक्षित झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती.राजर्षी शाहूराजे फक्त राजगादी सांभाळणारे राजे नव्हते, तर राजेपणातील माणूसपण जपणारे राजे होते. एखादा उपक्रम समाजासाठी राबविला तर त्याची व्यवस्थित अमलबजावणी करुन त्याचा लाभ ते तळागाळातील लोकांना मिळवून देत असत.
समाजात तळागाळातील समाजाला शिक्षण देण्यासाठी त्यांनी खास मोहीम राबविली.
शिक्षण म्हणजे काय हे माहित नसलेल्या सर्वसाधारण समाजाच्या मनामध्ये शिक्षणासंबंधी आस्था रुजविणे, शिक्षणासंबंधी अभिरुची निर्माण करणे आणि शिक्षण ही अवघ्या परिवर्तनाची गंगोत्री आहे याचे भान मिळणे हे महत्त्वाचे आहे, हे राजर्षींना अभिप्रेत होते. त्यांना समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्रय यांनी ग्रस्त झालेल्या सर्वसाधारण मानसाच्या परिवर्तनाची मुक्तीची ती मोहीम होती.
राजर्षी शाहू महाराजांची ही शैक्षणिक मोहीम तीन पायावर उभी होता.
१)शिक्षणविषयक सोयी सवलती, शिक्षण संस्थांची निर्मिती, शिक्षण संस्थांना मदत, शिक्षण विषयक निरनिराळ्या उपक्रमांचे संयोजन इत्यादी उपलब्ध करुन देणे.
२)विविध जातीजमातीसाठी विद्यार्थी वसतिगृहांची सोय करुन शिक्षणाच्या प्राप्तीचे मार्ग सुकर करणे, वसतिगृहयुक्त शिक्षणाला उत्तेजन देवून जातिभेदांसारखी कोळीष्टके झाडून काढणे.
३) सामान्य मानसाच्या मनामध्ये शिक्षणाविषयी अभूतपूर्व लालसा निर्माण करून, त्याच्या अनेकविध मागासलेपणाला सुरुंग लावणे.
याद्वारे राजर्षींनी शिक्षणविषयक सर्वकष क्रांती उभारली. त्यांच्या मोहीमेचे समाजशिक्षण हे प्रमुख होते.
त्यासाठी मुले मुली यांच्या साठी प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थापना, रात्रशाळा, प्रशिक्षण प्रशाला, क्षत्रिय वैदिक स्कूल, पाटील शाळा, अरेबिक प्रशाला, इन्फंट्री स्कूल किंवा सत्यशोधक शाळा इत्यादी. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या.
राजर्षी शाहू महाराज म्हणतात,’ प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे. तरी दुय्यम व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. माझ्या रयतेमध्ये प्राथमिक व उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याची माझी इतकी जोराने खटपट चालू आहे. यावरून शक्य तितक्या लवकर रयतेस स्वराज्य देण्याचे माझे धोरण आहे, हे आपल्या ध्यानी येईलच.’यावरुन राजर्षींचा शिक्षणाविषयीचा उच्च दृष्टिकोन लक्षात येतो.
आपले कागलचे बंधू जहागिरीचे अधिपती पिराजीराव घाटगे यांच्या प्रमुखत्वाखाली एक समिती स्थापन केली. सन १९१८-१९ ला हा शिक्षण रथ गतिमान झाला.
गावात निदान एक तरी शाळा असावी, असा आदेश काढला. ज्या गावात जी जात बहुसंख्य आहे, त्या जातीच्या इसमाने ती शाळा चालवावी असे ठरले. २८ मे १९१३ च्या आदेशाने खेड्यापाडयात शाळांसाठी जिथे म्हणून मोकळी जागा मिळेल,मग जिथे देवळे,चावडी, धर्मशाळा अशा ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या. या शाळेत सुरुवातीला लेखन ,वाचन व गणित हे विषय शिकवले जात. किंबहुना त्यावर अधिक भर दिला जाई. या देशात माणसांची वाण नाही, पण वाण नसलेल्या देशाला, माणसांच्याच हितासाठी कामाला कसे लावायचे हा मोठा प्रश्न दूरदृष्टीने राजर्षीने सोडविला. आपल्या कार्यात जनतेला सामावून घेण्याचा राजर्षीचा हा पवित्रा त्यांच्या कार्याच्या यशाचा महत्त्वाचा घटक आहे.
राजर्षींनी प्राथमिक शिक्षण मोफत व आणि सक्तीचे केले.
त्यांनी एक फर्मान काढले त्यात ते म्हणतात,शिक्षणास योग्य वयाच्या मुलांची यादी प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत मुलांच्या आईबापांनी आपापली मुले शाळेत पाठवावीत. अशा यादी विरुद्ध कोणास अपील करावयाचे असल्यास, त्याने तीस दिवसांच्या आत ते करावे. शाळेत येण्याच्या ठरलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत ती मुले जर शाळेत आली नाही, तर अशी नावे पालकासहीत त्या शाळेच्या हेडमास्तरांनी मामलेदार यांना कळवावीत. मामलेदाराने पालकांना त्यांच्या मुलांचे समन्स काढावे.त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. हे म्हणणे संयुक्तिक न दिल्यास त्या मुलाबद्दल एक रुपया दंड लावण्यात यावा. हा दंड मुलगा शाळेत येईपर्यंत करावा. पण आईबापांच्या निकडीच्या कामासाठी शेती वगैरे कामासाठी मुलांच्या मदतीची गरज असल्यास पंधरा दिवस मुलास घरी ठेवण्याची मुभा द्यावी. मात्र त्याची माहिती शिक्षकास देणे गरजेचे असेल. ह्या व्यक्तीरिक्त मुले हजर राहण्याबाबत आईवडिलांकडून हेळसांड होत असेल तर अशा दोषी आईवडिलांविरुद्ध पहिल्यावेळेस दंड म्हणून दोन आणे घ्यावेत.आणि वारंवार असाच गुन्हा होत असेल तर एक रुपया दंड घ्यावा. या सारख्या सुचनांमधून, शासक या नात्याने राजर्षींच्या लोकहिततत्पर ‘दक्ष’ मनाचे घडणारे दर्शन लोभसवाणे आहे.
२५ जुलै १९१७ मध्ये सर्व प्राथमिक शाळामध्ये फी माफी करण्यात आली.त्याच बरोबर एकूण योजनेच्या संदर्भात अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासंबंधीही हुकुम काढण्यात आला.
सोबत शाळांची निर्मिती, बांधबदिस्ती, देखभाल, उत्पन्न-खर्च इत्यादीसंबंधी व्यवस्थितपणे स्पष्ट नियम घालून देण्यात आले तर शिकविण्यासाठी परिक्षा घेऊन प्रशिक्षीत शिक्षकांची चांगल्या वर्तणूक असलेला,पंचविस वर्षे वयाच्या आतील गुणवत्ता धारण केलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश त्यांचे खाजगी कारभारी गोविंदराव देशाई यांना काढावयास लावले.
यावरून राजर्षीच्या कारभारातील शिस्त, गती आणि शिक्षणाची तळमळ लक्षात येते.
शिक्षणाने प्राप्त होणाऱ्या संस्काराचे अधिष्ठान नसलेल्या सर्वसाधारण जनसमाजाला शिक्षण द्यायचे आणि तेही स्वराज्याचे हक्क मनसोक्त भोगता यावेत या हेतूने द्यायचे, हे ठिक आहे.पण या योजनेसाठी पैशाची आवश्यकता होती.म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९१८ रोजी शिक्षण विषयक कराचा कायदा केला. त्यानुसार करवीर संस्थानातील शंभर रुपये अधिक उत्पन्न असणाऱ्या मंडळीवर उदा.डॉक्टर, वकील, सावकार, अंमलदार, ईमानदार वगैरेवर ‘शिक्षण कर’ बसविण्यात आला. त्याखेरीज नगरपालिका असलेल्या व नसलेल्या गावी या योजनेपूर्तीसाठी अनुक्रमे वार्षिक घरटी आठ आणेव एक रुपया असा ‘शिक्षण कर’ ठरविण्यात आला. ह्या कामी जनतेने भरभरून सहकार्य केले.
सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी एकत्र शिक्षण घेण्याची सोय केली. त्यातून जातीय वादाला आळा बसला.बंधूभाव प्रेमभावना वाढली.
या प्राथमिक व मोफत शिक्षण सक्तीच्या योजनेत सुमारे पाऊन लाख रुपये खर्च झाले असून ४,६३१ मुले शाळेत दाखल झाली. १९२२ साली हा खर्च तीन लाखांच्या घरात गेला. पुढे असे सांगण्यात आले की,
मुलकी परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा मास्तर, कारकून किंवा तलाठीची नोकरी देण्यात येईल. ते आश्वासन पाळण्यात आले.
राजर्षी शाहूमहाराजांनी शिक्षणविषयक सर्वगामी दृष्टिकोन अंगिकारला होता. केवळ शिक्षण देणे, त्यासाठी सोयी सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्याद्वारे केवळ शिक्षणविस्तार करणे एवढाच त्यांचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन नव्हता, तर जनसामान्यांनाच्या मनात शिक्षणासंबंधीची अभूतपूर्व लालसा रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राजर्षींनी ठरविलेले धोरण, अंगीकारलेली दृष्टी आणि केलेले प्रयत्न यावरून त्यांच्या शैक्षणिक सर्वस्पर्शित्वाची प्रचिती येते.याबरोबरच शाहू महाराजांनी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पारितोषिके, नादाऱ्या अशा सर्व साधारण मार्गांचा सर्रास वापर चालू ठेवला. ही नादारी देताना त्यांनी प्रथम शेतकी आणि मोलमजुरी करणाऱ्या जातींच्या मुलांना प्राधान्य दिले. नंतर व्यापारी किंवा ब्राह्मण मुलांना द्यावी, असा आदेश काढले.
कोल्हापूर इलाख्यात ९,१०,००० लोकसंख्यावर त्यांनी एकूण उत्पन्नापैकी रुपये १,४५,७२० ईतका शिक्षणावर खर्च केला.आज किती खर्च शिक्षणावर होतो ,हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
आता केवळ शिक्षणाच्या सोयी आणि मोफत शिक्षण करुन एवढ्यावर प्रश्न मिटणार नव्हता. तर परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहून शिक्षण घेणे अवघड होते त्यांच्या खाणे पिण्याची सोय असणे गरजेचे होते. त्यासाठी राजर्षींनी ही सोय आपल्या वाड्यात केली होती. पण विद्यार्थी संख्या वाढत होती त्यामुळे त्यांनी वसतिगृहाची सोय केली होती.
१५ एप्रिल १९२० रोजी उदाजी मराठा वसतिगृहाची स्थापना केली. याबरोबर व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग, दिगंबर जैन बोर्डींग, वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लिम बोर्डींग, मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डींग, श्री नामदेव बोर्डींग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन होस्टेल, रावबहादूर सबनीस प्रभू बोर्डींग, आर्यसमाज गुरूकुल, वैश्य बोर्डींग, ढोर-चांभार बोर्डींग, शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस, सुतार बोर्डींग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, सोमवंशीय आर्य क्षेत्रिय बोर्डींग आणि श्री देवांग बोर्डींग अशा वीस बोर्डींगची निर्मिती झाली. हाच आदर्श आणि प्रेरणेने महाराष्ट्रात विविध ठिकाणी वसतिगृह स्थापन झाले. त्यालाही राजर्षींनी मदत केल्याचे दाखले आपणास मिळतात.
त्यापैकी रयत शिक्षण संस्था, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षत संस्था, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, ताराराणी विद्यापीठ, विवेकानंद शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज इत्यादी संस्था.तर विदर्भात आठ जिल्ह्यात डॉ.पंजाबराव देशमुख यांनीश्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून, प्राथमिक, माध्यमिक व विद्यापीठीय शिक्षण देण्याचे प्रयत्न केले.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या निर्मितीमागील प्रेरणाही राजर्षींच्याच कार्यातून मिळाल्याचे दिसते.
यातील बरेच नामवंत विद्यार्थी उदयास आले. त्यापैकी दिगंबर जैन बोर्डींगचे विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील होते.आणि शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराजांनीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देवून परदेशात पाठविले. हे महत्त्वाचे आहे.
शाहूराजांनी त्याकाळात केलेली शिक्षण क्रांती आणि आजच्या काळात होत असलेली शिक्षण क्रांती यात तुलना केली तर बरीच तफावत दिसून येते.
आज शिक्षणाचे नवनवीन प्रयोग होताना दिसतात.ते विद्यार्थी हिताचेच आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थी ओघ वाढलाच पाहिजे.पण तसे दिसत नाही. शाळा विद्यार्थीसंख्या अभावी बंद होत चालल्या आहेत. याचा दोष कोणावर ठेवावा कळत नाही. जिल्हापरिषद शाळेची अवस्था बिकट होत चालली आहे. शाळेतील विद्यार्थीसंख्या घटत आहे. त्या मानाने लोकसंख्या वाढती आहे. पण तरीही ही अवकळा शाळेंना आली आहे. वसतिगृहे नामशेस होण्याच्या मार्गावर आहेत. कुठे विद्यार्थीसंख्या नाहीतर कुठे शिक्षकसंख्या अपूरी आहे. तरी नवीन नियमानुसार एक ते चार वर्गाला पाचवी आणि सातवीला आठवी इयत्ता जोडली जात आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांचा पाचवा आणि आठवा वर्ग अडचणीत आला आहे. यामध्ये नुकसान शिक्षक, शाळा आणि विद्यार्थी यांचे होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कारण जिल्हापरिषद शाळेत चार ते पाच मुलांसाठी नवीन वर्ग दिल्याने तेथे शिक्षकांचा अभाव आहे. तेथे विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण घेवू शकणार नाही. तर माध्यमिकला विद्यार्थी न मिळाल्याने ह्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर येतील. विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. काय करावे हे समजेनासे झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळांची धावपळ सुरु आहे. यातही विविध प्रलोभने देवून शैक्षणिक क्षेत्रात बाजाराचे स्वरूप निर्माण झाले आहे.यातून शिक्षण निसंकोच विकासवाटेने जाईल हा पालकांना पडलेला प्रश्न आहे.म्हणून शिक्षण हे शिक्षणच असावे त्यास बाजाराचे स्वरूप येवू नये.तरच विद्यार्थी चांगले घडतील.यात शंका नाही.
म्हणून आज शिक्षणाची गंगा निरंतर वाहती ठेवायची असेल, आणि शिक्षित पिढी घडवून देश समृद्धशाली बनवायचा असेल तर राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारधारेची नितांत गरज वाटते.