सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि.26 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. गडचिरोली मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले जाते. चालु आर्थीक वर्ष २०२३-२०२४ करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडुन अनुदान योजने अंतर्गत ६५, बिजभांडवल योजनेअंतर्गत ६५ व जनरल प्रशिक्षण योजनेअंतर्गत २६० उदिष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी पुढिल प्रमाणे तीन योजना आहेत. पहिल्या अनुदान योजनेत प्रकल्प मर्यादा रु. ५००००/- पर्यंत, सदर योजनेत ४००००/- पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व रु. १००००/- पर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे. दुस-या बिजभांडवल योजनेत प्रकल्प मर्यादा रु. ५०००००/- पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा. द.शे.व्याजदराने देण्यात येते, सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. ७५ टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवुन दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षात करावी लागते व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो. तिसऱ्या प्रशिक्षण योजनेत अनुसूचीत जातीतील लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रीक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रीक व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यवसायीक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत ३ महीने मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणार्थींना रु.१०००/- प्रति महिना विद्यावेतन देण्यात येते. अधिक माहितीकरीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल आय सी रोड, गडचिरोली दुरध्वनी 07132-222010 असा आहे.