सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.26: दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार विविध साहित्य, उपकरण व साधनांची गरज असते. ही साहित्य व साधने गरजू दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा आणि शैक्षणिक तथा वैद्यकीय पुनर्वसनास गति निर्माण करण्याकरिता आवश्यक बाब आहे, त्यात विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना हे तालुकापातळीवर आधुनिक साहित्य परवडणा-या दरात उपलब्ध करून देणे आणि वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन तालुका पातळीवर नुकत्याच दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असलेल्या गरजू दिव्यांग लाभार्थ्यांचे मोजमाप घेण्यात आलेल्या पात्र गडचिरोली जिल्हयातील अस्थीव्यंग दिव्यांगत्व प्रकारातील सुमारे १९६ दिव्यांग व्यक्तींना प्रति लाभार्थी सरासरी रू. ३ ते ४ हजार प्रमाणे विविध साहित्य, उपकरण व साधने जिल्हा समाज कल्याण विभाग, जि.प., गडचिरोली यांच्या सहकार्याने तालुकास्तरावर साहित्य साधने वितरण करण्यात येत आहे. आज दिनांक 24 मे 2023 रोजी पंचायत समिती आरमोरी आणि पंचायत समिती देसाईगंज येथील मोजमापानुसार पात्र असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना श्रीमती.बांगर, गट विकास अधिकारी (परविक्षाधीन), अशोक कुर्झकार,सहाय्यक गट विकास अधिकारी-डॉ.आनंद ठिकरे,तालुका आरोग्य अधिकारी, कितीकुमार कटरे, बालविकास प्रकल्प अधिकारी, नरेंद्र कुमार कोकुडे,गट शिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गट विकास विकास अधिकारी चेतन अ.हिवंज यांच्या हस्ते एकूण ३९ दिव्यांग लाभार्थ्यांना आधुनिक साहित्य व साधने निःशुल्क वितरित करण्यात आले.सदर साहित्य साधने वितरण कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी मा. संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली मा. कुमार आर्शिवाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजेंद्र भुयार, तसेच उप अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय आरमोरी तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक, पंचायत समिती अधिनस्त अधिकारी व कर्मचारी तथा समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.