अहेरी उपविभागाला चक्री वादळाचा जोरदार फटका.. — पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची भाग्यश्रीताई आत्राम यांची मागणी..!

डॉ.जगदीश वेन्नम

     संपादक

अहेरी:- मागील पाच-सहा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा अहेरी उपविभागाला जोरदार फटका बसला असून अनेक गावातील घरे,शौचालयाचे तसेच घरातील चैनीचे वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करून नागरिकांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.

      मागील पाच-सहा दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात चक्रीवादळ व अवकाळी पाऊस सुरू असून चक्री वादळाचा अहेरी उपविभागाला जबर फटका बसला आहे.विशेष म्हणजे मुलचेरा तालुक्यातील काही गावांना अहेरी तालुक्यातील बोरी,रामपूर, वेलगुर,नवेगाव,भुजंगराव पेठा,पेरमिली आदी गावांत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून अनेक घरांची छप्पर उडाल्याने घरातील चैनीचे वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर सध्या शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाला लागवड केली आहे.मात्र सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि चक्र वादळामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले असून अवकाळी पाऊस व चक्रीवादळ हे नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र आहे.

     याची माहिती मिळताच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी विविध भागात स्वतः पाहणी करून नागरिकांची अडचण जाणून घेतले.तर,काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठवून नुकसानीची माहिती घेतल्या. एवढेच नव्हे तर स्वतः संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाचारण करून मोका पंचनामा करायला लावले.पंचनामे झाले असलेतरी शासनाकडून नुकसानग्रस्त नागरिकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आले नाही.त्यामुळे प्रशासनाने त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावे अशी मागणी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.

बत्तीगुल झाल्याने अनेक गावे अंधारात

चक्रीवादळाने नागरिक चांगलेच हादरले असून या चक्रीवादळाची तीव्रता खूप असल्यामुळे घराचे कौल तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विजेचे पोल पडल्यामुळे बत्ती गुल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने त्वरित याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरक्षित करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.