
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मुंबई : वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणार.
पायाभूत सुविधा भक्कम करण्याबरोबर लोकप्रतिनिधी, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, महिला, वृद्ध, युवक आदी घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्यानंतर सदर जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी आता राज्याचे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवली आहे.
नामदार भरणे हे अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. शासनाकडून त्यांच्यावर पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आल्याने हा विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.