
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
वाळू म्हटले की,सरळ आणि सोपा व्यवसाय,वाळूची चोरी करा आणि लवकरच मालामाल व्हा!..असा हा वाळू चोरीचा गोरखधंदा चिमूर तालुक्यात मागिल काही वर्षांपासून जोरदार सुरू आहे.
मात्र,या अवैध वाळू चोर व्यवसायाकडे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिधर राजमाने,मंडळ अधिकारी,तलाठी आवश्यक आणि परिणामकारक लक्ष देताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.यामुळेच वाळू चोरांचे खूप फावते आहे.
मात्र,चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) गावाशेजारील उमा नदीच्या पात्रातून दररोज वाळूचे होणारे सातत्यपूर्ण उत्खनन आणि अवैध वाळू उत्खननाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक करण्यात येणारे दुर्लक्ष कोणाच्या फायद्यासाठी आहे हे चिमूर तालुक्यातील जनतेला कळणे आवश्यक आहे.
तद्वतच हे वाळू चोर कुठले आहेत?,कुणाचे माणसे आहेत?,चोरीची वाळू दुलाई (आवागमन) करण्यासाठी वापरण्यात येणारे हायवा वाहान कुणाचे आहेत? उमा नदी ते भरळ नाला इथपर्यंत वाळूची दुलाई करणारे ट्रॅक्टर कुणाचे आहेत? वाळूचा उपसा करणारी जेसीबी कुणाची आहे? २० ते २५ मजूर ट्रॅक्टर मध्ये वाळू भराईसाठी असतात ते मजूर कुठले आहेत? याचा शोध चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने का म्हणून घेत नाही?
किंवा पोलिस अधिकाऱ्यांसह खनिकर्म,वन, विभागाची टिम तयार करून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रिधर राजमाने धाड का म्हणून टाकत नाही? हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
लोकसेवक या संज्ञेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,सर्व अधिकारी,सर्व कर्मचारी येतात.
वरील संज्ञे प्रमाणे सर्व लोकसेवकांनी आपले कर्तव्य पणाला लावून चिमूर तालुक्यातील खनिज संपदेचे रक्षण केले पाहिजे म्हणजेच जनतेच्या नैसर्गिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे.
कारण लोकसेवक कर्तव्यदक्ष असले तर सर्व नैसर्गिक व अनैसर्गिक मालमत्तेचे रक्षण करु शकतात.लोकसेवक हे कर्तव्यहिन असले तर ते स्वतःच्या फायद्यासाठी कर्तव्याला अयोग्य कार्यपद्धती नुसार वळन देतात आणि अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करतात.हाच फरक जनतेला कळत नसल्याने वाळू चोरांचे व लोकसेवक अधिकाऱ्यांचे चांगलेच फावते आहे.
अवास्तव कारण सांगणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे प्रामुख्याने लोक सेवेकडे आणि लोकांच्या नैसर्गिक आणि कृत्रिम मालमत्तेच्या संरक्षणा संबंधाने दुराग्रहपुर्वक दुर्लक्ष करतात या सत्याला ते नाकारुच शकत नाही.
म्हणूनच आमदार,अधिकारी,कर्मचारी यांनी आपले योग्य कर्तव्य लोकसेवेसाठी आणि लोकांच्या नैसर्गिक व कृत्रिम मालमत्तेच्या रक्षणासाठी पुढे आणले पाहिजे या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.