
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर : 26 फेब्रुवारी 2025 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर मुन्ना तावाडे यांची आज नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीचे नियुक्तीपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात देण्यात आले.
मुन्ना तावाडे यांचा पत्रकारितेत दीर्घकालीन अनुभव असून,ते यापूर्वी पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष होते.
याशिवाय,त्यांनी चंद्रपूर काँग्रेस च्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.सध्या ते समाज समता संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
तावाडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चे संस्थापक संपादक असून,या माध्यमाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या आणि आव्हानांना समोर आणण्याचे कार्य करत आहेत.
मुन्ना तावाडे यांना माजी निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांचे मार्गदर्शन लाभत आहे,जे त्यांच्या कार्यासाठी एक मोठे प्रेरणास्त्रोत आहे.
मुन्ना तावाडे यांचे मूळ गाव गोंडपिंपरी तालुक्यातील गोजोली आहे,जिथून त्यांनी समाजसेवा आणि पत्रकारितेची दिशा स्वीकारली.
आजच्या बैठकीत सोशल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट करत,डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता व्यक्त केली.
यावेळी इक्बाल शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,आणि सर्वानुमते मुन्ना तावाडे यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सिंदेवाही,मूल आणि कोरपणा तालुक्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करत,आजच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील डिजिटल मीडिया पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुन्ना तावाडे यांच्या नेतृत्वात संघटना अधिक सक्षम आणि न्यायसंगत होईल,अशी आशा व्यक्त केली आहे.त्यांच्या कर्तृत्वाने चंद्रपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांना एक नवीन दिशा मिळेल,हे निश्चित आहे.