
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील जुनी मार्केट कमिटीच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना म्हणाले की,, मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान व्हावे, हे देशातील 65 टक्के जनतेच्या मनात आहे. यासाठी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत, म्हणून महायुतीमधील घटक पक्षांशी सुसंवाद ठेवावा. आपल्या कार्यालयामध्ये घटक पक्षाचे कार्यकर्ते आले पाहिजेत. घटक पक्षाच्या कार्यालयात जाण्यास काही हरकत नाही. एकमेकाचा मानसन्मान ठेवा, कारण लोकसभेच्या चारशे जागा निवडून आल्या पाहिजेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
इंदापूर येथील जुन्या बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करत होते. मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राजेंद्र तांबिले, श्रीमंत ढोले, प्रताप पाटील, किरण गुजर, दशरथ डोंगरे, प्रशांत पाटील,बाळासाहेब करगळ, जय पवार, श्रीराज भरणे, बाळासाहेब ढवळे, दीपक जाधव आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भविष्यात पक्षीय मतभेद संपुष्टात आणून इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने मी पुढाकार घेईन, याबाबत सर्व प्रमुखांशी, संबंधितांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टिकोन समजून घेईन, एकत्रितपणे विकासाभिमुख वाटचाल करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पवार पुढे म्हणाले, 33 वर्षे झाली, मी प्रतिनिधित्व करत आहे. 1991 साली इंदापूर तालुक्यातील जनतेने पाठिंबा दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मला मताधिक्य मिळाले होते. महायुतीच्या वतीने जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला भरघोस मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. साखर कारखान्यांचा तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राप्तिकराचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोडवला.
जर महायुतीचा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जिंकून आला तर अनेक विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेता येईल. महाआघाडीचे सरकार गेल्यानंतर जवळपास एक वर्ष सत्तेमध्ये आपण नव्हतो. त्या वेळी विकासकामे थांबली. तसेच अनेक विकासकामे स्थगित राहिली होती, असे सांगून पवार पुढे म्हणाले, मी तुमच्या कामाचा माणूस आहे. आपल्या पदाचा उपयोग जनतेसाठी झाला पाहिजे. लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुतीसोबतच लढवायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या आपण लढणार आहोत. भूतकाळामध्ये काय घडले ते सोडून दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असे कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
आमदार दत्तात्रय भरणे शेतकरी मेळाव्यानिमित्त बोलत असताना म्हणाले की,, उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे आपल्या इंदापूर तालुक्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी जितका जास्तीत जास्त निधी आणता येईल तेवढा दादा साहेबांच्या मदतीने निधी मिळाला अनेक विकास कामे तालुक्यात मार्गी लावली मोठमोठे पूल असतील बंधाऱ्या दुरुस्ती असतील अशा कामासाठी जास्त निधी मिळवून दिला मेळाव्याप्रसंगी दत्तात्रय भरणे यांचे उद्गार..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले.