ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- तलाठी साझा क्रमांक १३ बोदरा, मौजा जांभळी/सडक येथील गट क्रमांक ९६ आणि लगतच्या गट क्रमांक ९५ चा सीमावाद असल्याची माहिती दुय्यम निबंधक बी.बी. रींडे यांना असताना सुद्धा विक्री पत्र दस्त क्रमांक ९४५/२०२४ केल्याने सदर दस्ताची नोंदणी रद्द करून फसवणुकीच्या फौजदारी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबित करावे.
याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. सहजिल्हा निबंधकाकडून काय भूमिका घेतली जाते. याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.
मौजा जांभळी येथील गट क्रमांक ९६ चा लगतचे गट क्रमांक ९५ चे भोगवटदार यांचेशी सीमावाद असल्याने सदर गट क्रमांक वादग्रस्त असून गट क्रमांक ९६ शासनाकडून सीलिंग कायद्याप्रमाणे काबिलकास्तकारी म्हणून मिळालेली आहे. सदर गट क्रमांकाची दस्त नोंदणी करण्यास मनाई करण्यात यावी.
या करिता गट क्रमांक ९५ चे शेतकऱ्याने २६ जून २०२४ ला तहसीलदार साकोली यांना अर्ज केला होता. त्यानुसार १ जुलै २०२४ रोजी तहसीलदार साकोली यांनी मनाई हुकुमाचे पत्र दुय्यम निबंधक बी. बी. रींडे यांना पाठविले होते. स्वयंस्पष्ट आदेश असताना सुद्धा आदेशाची सहनिषा न करता केराची टोपली दाखवून गट क्रमांक ९६ चे मालकासोबत आर्थिक देवाणघेवाण करून खोट्या दस्ताऐवजाच्या व चुकीच्या माहितीच्या आधारे दुय्यम निबंधक बी.बी. रींडे यांनी विक्रीपत्र दस्त क्रमांक ९४५/२०२४ करून दिला.
या दस्तामध्ये चुकीची चतु:सीमा शेतजमीन पडीत असताना खोटेपणाने कब्जा व जोत असल्याची नोंद केली आहे. तसेच लोकसंख्येतही फरक दाखवून शेती धानारी दाखवली असली तरी अभिलेखानुसार पडीत आहेत. ही शेती विकल्यामुळे विक्री करणारे भूमिहीन झाले असून दस्त नोंदणी कायदा १९८० चे उल्लंघन झाले आहे. गट क्रमांक ९६ कायम पडीत असून दस्त नोंदणीत सिंचनाचे साधन बोअरवेल दाखविण्यात आले आहे.
खोटे दस्ताऐवज व चुकीच्या माहितीच्या आधारे करण्यात आलेले विक्रीपत्र दस्त क्रमांक ९४५/२०२४ दस्त नोंदणीमुळे गट क्रमांक ९५ चे भोगवटदार मानसिक, आर्थिक, शारीरिक व्यथित झाले असल्यामुळे सदर दस्तासह अनेक खोटारड्या दस्ताची चौकशी करून मोठी रक्कम वसूल करणारे दुय्यम निबंधक बी. बी. रींडे यांचेवर फौजदारी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच सदर दस्त याथाशीघ्र पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावा.
या करिता सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. कैलास गेडाम, दादू बडोले, विलास मेश्राम, सचिन शहारे, कालिदास खोब्रागडे, आकाश जनबंधू यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.