ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- येथे अती गंभीर विषय उघडकीस आला असून आता गुन्हे दाखल होईल असा संतापजनक प्रकार येथे सुरू आहे. बैलगाडी चालकांची ही अरेरावी व मूक प्राण्यांना वाळूंचे ओझे लादून थंडीत बेदम मारहाण करीत ८ ते ९ जनावरांच्या पायांची हाडे मोडलीत.
पण प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अत्याचार व सुरक्षा अधिनियम हा गंभीर गुन्हा प्रकार शासनाला दिसत नाही का.? दररोज लहान मुले महामार्गावर थोडक्यात बचावतात, जनता बोलली तर त्यांचेशी दमदाटी व अरेरावी प्रकार करतात अशी भूमिका घेऊन साकोलीतील जनसेवक हे पत्रकारांना घेऊन ( मंगळ. २४. ला ) धर्मापूरी गटग्रामपंचायतवर धडकले व तातडीने बैठकीत निर्णय घेतला. अन्यथा साकोलीत एक दिवस भयंकर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
धर्मापूरी, कुंभली व सावरबंद येथून चुलबंद नदीघाटाहून अवैध मार्गाने कोणतीही पावती न घेता रेतीचा उपसा सुरू आहे. सुमारे १८० बैलगाड्या दररोज पहाटेपासून शहरात येतात. सोमवार ता. २३ ला स. ७:३० दरम्यान जूने पं.स. चौकात नियमतोड मार्गाने बैलगाडी टाकून लहान शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले होते.
तलाव वार्ड लाखांदूर रोडवर शेण सांडून २४ दूचाकीस्वार घसरून पडले होते ही बाब साकोली प्रसारमाध्यमांवर येताच येथील जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी धर्मापूरी गटग्रामपंचायत गाठले. तर वेगळाच प्रकार समोर आला. यात काही दिवसांपूर्वी अती भार लादल्याने ९ बैलांच्या पायांची हाडे मोडलीत. त्या हैवानांनी पाय दूरूस्त करून बैलजोडी विकून दूस-या आणल्या. एकीकडे मूक प्राण्याला तीक्ष तुतारी टोचू नये या भयंकर नियमाने अख्ख्या महाराष्ट्रातील शंकरपटांवर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती.
मात्र साकोलीत हा मूक प्राणी अत्याचार व सुरक्षा अधिनियमांची सर्रासपणे ऐशीतैशी केली जात आहे. मुख्य महामार्गावर नियमतोड मार्गाने बैलगाडी टाकून दररोज अपघातमय स्थिती आणून ठेवतात. बैलगाडी जनावरे चालवितात तर हे चालक अंथरूण पांघरूण बंडीवरच निवांत झोप घेतात. परत शासकीय अधिकारींनी सांगितले की, हे बैलगाडी चालक कोणालाही न विचारता अवैध मार्गाने शासकीय महसूल बूडवित कितीतरी ब्रॉसटन वाळूची दररोज चोरी करतात. यांना आम्ही परवानगी दिली नाही. हटकले असता पोलीस पाटील व तंटामुक्त समिती अध्यक्ष यांसोबत धमकी देत अरेरावीची भाषा करतात. नदी घाटावर हे हैवान अती भार लादून बैलगाडी चालक बंडी नदीतून वर चढायला हवी म्हणून मूक प्राण्याला या थंडीत बेदम मारहाण करतात.
यात त्यांच्या पायांची हाडे मोडली. हा मूक प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अत्याचार व सुरक्षा अधिनियम अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही का.? यांकडे महसूल विभागाचे का लक्ष नाही. की या शासकीय नियमांची अवहेलना या साकोलीतच होऊ शकते. असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. धर्मापूरी गटग्रामपंचायतने नदी मार्गावर “वाळू चोरी करू नये” असा फलक लावला असतांनाही अरेरावी करून शासनाला चूना लावतात वरून मूक प्राण्यांवर नदीघाटावर बेदम मारहाण करून अत्याचार करतात. हा संतापजनक प्रकार तातडीने बंद करावा अन्यथा मूक प्राणी सुरक्षा अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा या तातडीच्या बैठकीत देण्यात आला आहे.
या बैठकीत सरपंचा पुष्पा खोटेले, पोलीस पाटील सुशिल भोंगाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष लुंगाराम शिवणकर, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, अनिल कापगते, किशोर बावणे, माजी पोलीस पाटील योगराज वाघमारे, रमेश खोटेले, आशिष चेडगे, ऋग्वेद येवले, विनोद कांबळे व काही गावकरी हजर झाले होते. शेवटी तहसील व पोलीस प्रशासनाकडे ही लक्षवेधी मागणी केली की, तातडीने या मूक प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या हैवानांचा बंदोबस्त करावा.
यांवर प्राण्यांच्या पायांची हाडे मोडल्या प्रकरणी आरोपींना शोधून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व यांच्या नियमतोड प्रकाराने दररोज महामार्गावर लहान मुलांसह जनतेचा जीव वाचवण्यासाठी तातडीने कारवाई करावी. अन्यथा साकोलीत फार मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे महेश पोगळे, किशोर बावणे व अनिल कापगते यांनी दिला आहे.
काय म्हणतात ग्रामसेवक व सरपंच –
“आम्ही ग्रामपंचायत वतीने या बैलगाडी चालकांना कोणतीही परवानगी दिली नाही. नदी रोडवर आमचा प्रतिबंधीत फलक लावला आहे. हे नियमांची पायमल्ली करून वाळूची चोरी करतात. सांगितले तरीही ऐकत नाही तर आमच्या चपराशी व कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन अरेरावीची भाषा वापरतात. पण यात मूक प्राण्याला बेदम मारहाण करून शरीराचा अवयव निकामी करणे हा भारतीय प्राणी संरक्षण १९६० अधिनियमात फार मोठा गंभीर गुन्हा ठरतो. यात १० वर्ष कारावास व ५० हजार दंडाचे प्रावधान आहे”
— श्री. नान्हे
“ग्राम विकास अधिकारी”
पं. स. साकोली
ग्रामपंचायत धर्मापूरी/कुंभली
आम्ही कितीदा सांगितले तरीही ऐकत नाही, मागे अश्याच अपघातात बैलांच्या पायांची हाडे मोडलीत. दमदाटी करून सांगतात की वाळू आम्ही गावातच नेतो पण मध्यरात्री ३ वाजता पासून विना परवाना हे १८० बैलगाडी चालक शासकीय महसूल बूडवित वाळू काढून साकोलीत विकतात. यांवर प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे”.