प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, 26 डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूरनगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण झाले असून विविध संकल्पनावर आधारित रंगीबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूर नगरी सज्ज झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण तयारी झाली आहे. 26 ते 31 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडावी यासाठी आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुरूप स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण : बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात होणा-या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन सभागृह येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.
67 वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते सलमान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर येथील क्रीडा संकुलमध्ये होणारी ही स्पर्धा यशस्वी व्हावी, अशी भावना अभिनेते सलमान खान यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशातून व्यक्त केली आहे. त्याचसोबत जयंत दुबळे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, रोहिणी राऊत ,माधुरी गुरनुले, ज्योती चव्हाण आंतरराष्ट्रीय धावपटू , सायली वाघमारे अथलेटिक्स परीक्षक यांनी देखील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत
67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी आवाज दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज ही या थीम साँगची वैशिष्ट्ये ठरत आहेत.
सूर्यनमस्कारातील मुद्रा, रंगबेरंगी भिंती, उड्डाणपूलावर रोषणाई : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डाणपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत.