दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात दहशतीचे आरोप म्हणजे लायकी नसलेल्या विरोधकांकडून चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी यांनी केली.
त्यांच्या टीकेचा रोख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष,पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर व तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर यांच्या विरोधात होता.
या शिंदे गटातील सेनेचे पदाधिकारी असलेल्या जवळेकर,पोखरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,माजी सदस्य अरुण चांभारे,अनिलबाबा राक्षे,बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती सुरेश शिंदे या वेळी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर म्हणाले की,आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीका करणार्या विरोधकांनी व त्यांच्या सहकार्यांनी मागच्या काही काळात एका हॉटेलमध्ये गुंडासोबत जाऊन गोळीबार केला होता.महिला पदाधिकार्यांवर हल्ला केला याची जाणीव त्यांना नाही.
खेड तालुक्यात आ.दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे सुरू आहेत.या माध्यमातून जनतेचा त्यांना नेहमीप्रमाणे आमदार मोहिते यांना पाठिंबा वाढत आहे.पुढचे आमदार तेच असणार हे जनतेने निश्चित केले आहे. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांची नाहक बदनामी करून आपली नसलेली राजकीय उंची वाढविण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्या अशा लबाडीला खेडची जनता ओळखून आहे. बाजार समितीच्या जिल्हा सहकारी निबंधक कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाला असून, विरोधकांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.असे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले आहे.