चर्होली वडमुखवाडीत ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ साकारण्यात येणार….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : चऱ्होलीतील वडमुखवाडीत संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत नामदेवमहाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्पाच्या परिसरात ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ साकारण्यात येणार आहे.

        समूहशिल्पामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवमहाराज यांच्या भेटीवर आधारित २५ शिल्प असून, आता या ठिकाणी विविध संतांच्या जीवनावर आधारित ४७ प्रसंग दाखविले जाणार आहेत. वडमुखवाडीत संत ज्ञानेश्वरमहाराज थोरल्या पादुका मंदिराजवळ संत ज्ञानेश्वर सृष्टी साकारण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सहा कोटी ४५ लाख रुपये खर्च करणार आहे. या शिल्पांना महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाची मान्यता मिळाली आहे.

        पालखी चाले पंढरी, संत नामदेव महाराजांचे औंढा नागनाथ मंदिरातील कीर्तन, संत ज्ञानेश्वर विहिरीतील पाणी पिण्याचा प्रसंग, भिंत चालविल्याचे दृश्य, ज्ञानेश्वरी लेखन, संत निवृत्तिनाथांना गहिनीनाथ उपदेश करताना, संत तुकाराममहाराज यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीमहाराज, चंद्रभागा नदी, संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजणे, ज्ञानेश्वर-निवृत्ती गुरू-शिष्य, नामयाची खीर, नामदेव पायरी पंढरपूर, विठू माझा लेकुरवाळा, संत एकनाथमहाराज दार उघड बया, संत तुकाराममहाराज व छत्रपती शिवाजीमहाराज भेट, चांगदेवमहाराज गर्वहरण, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा प्रसंग, संत ज्ञानेश्वर महाराजांची गवळण, संत तुकाराम महाराजांचा अभंग, संत ज्ञानेश्वरांच्या सार्थ ज्ञानेश्वरीतील १२ अध्याय यावर आधारित हे शिल्प असणार आहेत.

         वडमुखवाडीत समूहशिल्पाजवळ विविध संतांच्या जीवनावर आधारित ४७ प्रसंग दाखविले जाणार आहेत. हे काम सुरू करण्यात आले आहे असे कनिष्ठ अभियंता वृषाली पोतदार यांनी सांगितले आहे.