फुकट मिळाल्याची किंमत शून्य!

       आमचे आई – वडील परिस्थितीशी संघर्ष करून लेकरांसाठी भावी सुखाचा पाया रचतात. त्याच पायावर उभे राहून लेकरं सुखी होतात आणि त्याच पायाला क्षुल्लक समजतात.पुन्हा वर म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं….?

        तुम्ही काय वेगळं केलं? तुमचं कर्तव्यच केलं,दुनियाची रितच ती आहे…..!

       पण जेव्हा हेच शब्द स्वतःच्या लेकरांच्या तोंडून ऐकावे लागतात…….

      तेंव्हा मात्र आमच्या आईवडिलांच्या दुखावलेल्या हृदयाची किंमत समजते…….

       अगदी असेच कांहीसे आमचे आदर्श,आमच्या महापुरुषांच्या बाबतीत घडलेले असते.आमचे आईवडील तर आम्हाला ( आम्हा भावंडांना ) जन्माला घालून येईल त्या परिस्थितीला तोंड देत आम्हाला मोठे करतात.जे जे शक्य असेल ते ते आमच्यासाठी सर्वकाही त्याग,संघर्ष करून करतात,आम्हाला आमच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करतात…. 

         परंतू,महापुरुष व महामाता मात्र त्यांच्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन, स्वतःच्या संसाराची हतबलतेमुळे राखरांगोळी करून समाजाचा, देशाचा,अखिल मानवतेच्या कल्याणाचा विचार,संघर्ष,त्याग,समर्पण करून आमचे कल्याण करतात. कारण ते दूर… दृष्टीने विचार करून,अवघे विश्वची माझे घर समजून……..

          निरागस जनतेला कोणतीही आच न लागू देता, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता ( जनतेने जयंती साजरी करावी, स्मृतिदिनी मला अभिवादन करावे, माझ्या जीवनचरित्र आणि संघर्षावर भाषणे ठोकावीत ) केवळ आम्ही दाखवून दिलेल्या मार्गाने जनतेने आचरणातून सिद्ध व्हावे, जेणेकरून त्यांचेच व त्यांच्याच भावी पिढीचे कल्याण होईल.

     यासाठीच तर ही महापुरुष मंडळी अख्खे आयुष्य वेचतात..

      परंतू,याच जनतेत काही अती हुशार मंडळी असतात( जी थोडीफार पुस्तके वाचून माहितीगार बनतात ज्ञानी नव्हे ) जी हे महापुरुष केवळ मलाच समजले असा आव आणून त्याचे वैचारिक भांडवल करून,व्यवस्थेला ( केंद्रसरकार, राज्य सरकारे ) सामाजिक शोषण करण्यासाठी वैचारिक भांडवल निर्माण करून देतात,ते केवळ स्वतःच्या पदरात फुटकळ लाभ पाडून घेण्यासाठी ( जीवन गौरव पुरस्कार, सत्कार, सन्मान किंवा आर्थिक लाभ इत्यादी )……

       जनता सुद्धा या भाडोत्री विचारवंतांच्या मार्गदर्शनाला बळी पडते.आणि मुख्य महापुरुष आणि महामातांच्या क्रांतीपासून वंचित बनत जाते.यामध्ये जनतेची चूक अजिबात नसते. तिला दोष देताच येत नाही.कारण लोकशाहीत सर्वसामान्य जनता ही निरागस बाळासारखी असते..

         परंतू,अशा ( Half knowledge is very dangerous) मधल्या अर्धवट विद्वानांकडून देशाला व समाजाला गेल्या 70 वर्षात फार मोठा धोका निर्माण झाल्यामुळे आमचे राज्य,आमचा देश एकंदरीत आमचे जग एका भयानक अशा डेंजर झोन मध्ये सापडलेले आहे.

         अशा स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या मंडळीच्या हातात ( ज्यांच्याकडे पदव्यांची रांग लागलेली असते ) सामाजिक ध्रुवीकरण असल्याचा भास येथील राजकारण्यांना झाल्यामुळे,ही राजकारणी मंडळी याच सुशिक्षितांना हाताशी धरून जनतेने सदविचारी बनू नये,त्यांनी दारिद्र्यातच खितपत पडून राहावे,किंवा भलेही मादक पदार्थाच्या आहारी जाऊन त्यातच संपले तरी चालतील असे वातावरण आणि परिस्थिती निर्माण करण्यासाठी याच सुशिक्षित स्वतःला समजणाऱ्या मंडळी कडून सामाजिक शोषणाचे पर्याय त्यांच्या अघोरी बुद्धीतून काढून घेऊन,तीच्याबळावर राज्य आणि देश ही राजकारणी मंडळी केंद्रात आणि राज्यात राज्यकारभार चालवत असतात.

        ज्याप्रमाणे म्हणतात ना देव आणि भक्त यामध्ये पुजारी मध्यस्थी असतो, अगदी याप्रमाणे महापुरुषांची क्रांती आणि व्यवस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये हे भाडोत्री विचारवंत ( स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे ) बडवे म्हणून मध्यस्थी असतात.

       याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला सर्वकाही मोफत मिळाले म्हणून त्याची किंमत आम्ही त्याग,संघर्ष आणि समसर्पनातून न समजून घेतल्यामुळेच आमचे (जनतेचे)नुकसान यांच्यामुळे प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरित्या झालेले आहे..

         ज्या महापुरुषाने संपूर्ण जीवनात कोणतीही अपेक्षा न ठेवता,देशातच काय संपूर्ण विश्वात कुठेही रक्तरंजित पाट वाहू नयेत,संपूर्ण सजीवसृष्टिचे कल्याण निर्जीवसृष्टीच्या साहाय्याने कसे करता येईल याचा विचार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या,”भारताच्या संविधानाचे,महत्व फुकट कळाले काय?

    याचे महत्व केवळ आम्हाला फुकट मिळाले म्हणून किंमत नाही.किंमत नाही म्हणून या बडव्यांनी जागृती केली नाही किंवा करू दिली नाही.म्हणून आमचा देश आणि राज्य सर्वच क्षेत्रात मागास होऊन दिशाहीन, दशाग्रस्त अवस्थेतून जात आहे.!

           तेंव्हा हे जर सर्व टाळायचं असेल तर आता जनतेनीच या बडव्यांना आणि राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी संविधानाला वाचून,समजून घेऊन,स्वतः जागृत होऊन,कृतीतून अविष्कारीत होणे.हाच एकमेव उपाय आहे….

        या लेखातून वाचकाने हा सदवीचार जरी मनात रुजवला तरी लेखाचे सार्थक झाले असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हीच चळवळ जिवंत राहावी हेच तर कार्यकर्त्यांचे समाधान होय..

          एखाद्या महापुरुषाने फुकट काही दिलेले असले तर त्याची किंमत आपल्याला जाणीवेतून असलीच पाहिजे…

        परंतू,व्यवस्थेने लाडकी बहीण,भाऊ,ऐनवेळी पेट्रोल,गॅसचे भाव कमी करून मोफत मिळाल्याच्या कारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

            जागृतीचा लेखक

               अनंत केरबाजी भवरे

             संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…