पालखी सोहळा वारीकाळात वाहनांना शहरात प्रवेश बंदी, पासधारक वाहनानांच आळंदीत प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : संत श्रीज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि.29) होणार आहे. सोहळ्यासाठी मंगळवार (दि. 25)पासून शहरात दिंड्या व वारकरी दाखल होण्याची शक्यता आहे.

            या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनाने वारीकाळात वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. केवळ दिंड्याच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.

              मंगळवार (दि.25) ते रविवार (दि.30)पर्यंत ही बंदी असणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याने केले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर महामार्गमार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ असा व नगर महामार्गमार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चर्‍होली बुद्रुक फाटा ते चर्‍होली खुर्द अशा जोडरस्त्याचा वापर करता येणार आहे. पुण्यावरून येणार्‍या वाहनांना चर्‍होली फाटा-मोशीमार्गे-चाकण असा पर्यायी मार्ग असणार आहे. 

               मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येक चौकात लोखंडी बॅरिकेडिंग करून चारचाकी वाहने सरसकट प्रवेश बंद ठेवण्यात येईल. प्रदक्षिणा रस्ता, चावडी चौक, पालिका चौक, जुना एसटी स्टॅन्ड भागात चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करण्यास बंदी केली जात आहे. तर महाद्वार, भराव रस्ता, गणेश दरवाजा, आजोळघर, हनुमान दरवाजा याठिकाणी चारचाकी वाहनांसह दुचाकीस प्रतिबंध केला जाणार आहे.

                 पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून वारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त मंजूर केला आहे. यामध्ये पाच सहाय्यक पोलिस आयुक्त, पंचवीस पोलिस निरीक्षक, एकशे आठ पोलिस उपनिरीक्षक, आठशे पन्नास पोलिस अंमलदार, एसआरपीएफच्या दोन कंपन्या, बॉम्बशोधक पथक असणार आहे. पालखी प्रस्थान होईपर्यंत दोन सत्रांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येईल.

                 यामध्ये महाद्वारात तीस पोलिस, मंदिरात सत्तर, भराव रस्त्यावर चाळीस, प्रदक्षिणा मार्गावर दीडशे पोलिस असतील.पालखी प्रस्थान शनिवारी झाल्यानंतर पालखी रविवारी (दि.30) सकाळी सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.