दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आषाढी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पालखी सोहळे प्रतिवर्षी पंढरपूरला जातात. परंतु शासनाने फक्त १० पालखी सोहळ्यातील नोंदणीकृत दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले असून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक पालखी सोहळ्यातील दिंडीला हे अनुदान मिळावे अशी मागणी पालखी महासंघाचे निमंत्रक हभप चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी शासनाकडे केली आहे.
पायी पंढरपूरला जाणाऱ्या दहा पालखी सोहळ्यातील तब्बल दीड हजार नोंदणीकृत दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयानंतर वारकरी संप्रयादातील काहींनी आक्षेप घेत अनुदान नको अशी भूमीका सोशल मीडियावर मांडली आहे. तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यावेळी चैतन्य महाराज कबीरबुवा म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व इतर आठ पालखी सोहळ्यातील नोंदणीकृत दिंड्यांना अनुदान मिळणार आहे.पण महाराष्ट्रातून सुमारे दिडशे ते दोनशे छोट्या मोठ्या पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंड्या पंढरपूरला येत आहेत.त्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना सुध्दा शासनाने जाहीर केलेल्या अनुदाचा लाभ मिळवा. अशी मागणी पालखी महासंघाचे निमंत्रक हभप चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी अनुदान समितीचे सदस्य व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कडे केली आहे.