वणी : परशुराम पोटे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण येथील चक्क १८ लाखाचे बनावट मुदत ठेव पावत्या (एफडिआर) जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे जमा करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांच्यावर अखेर ४ महिन्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ज्या बँकेची बनावट एफडिआर त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे जमा केली त्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालकही आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांच्यातर्फे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद पुंडलिकराव राऊत यांनी गुरुवार २३ जुन रोजी पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी आरोपी कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार रा. दिग्रस, ता. झरी जि. यवतमाळ यांच्या विरुद्ध कलम ४२०, ४६७, ४६८ भादवि अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेचे १६ एफडिआर बनावट असल्याचे उघड झाल्यावर वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रधान सचिव सहकार विभाग महाराष्ट्र राज्य व सहकार आयुक्त पुणे यांना लेखी तक्रार करून राजीव येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु राजकीय दबावामुळे सहकार विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीव येल्टीवार यांचे मध्यवर्ती बँक संचालक पद धोक्यात आले आहे.