वणी :- परशुराम पोटे
येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्मृती स्तंभ समितीच्या वतीने परसोडा येथील जंगल सत्याग्रह स्मृती स्तंभ व परिसराचा विकास केंद्र शासनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विकास करण्यात यावा अशी मागणी येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्मृती स्तंभ समितीच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे व निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
आद्य सरसंघचालक केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या प्रेरणेने म. गांधी यांच्या आवाहनानुसार लोकनायक बापूजी अणे यांच्या मार्गदर्शनात वणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन नगर संघचालक रामभाऊ भागवत यांच्या नेतृत्वात वणी शहराजवळील परसोडीच्या जंगलात वृक्ष तोडून स्वातंत्र्य आंदोलनातील असहकार चळवळी अंतर्गत जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी 35 ते 40 या सत्याग्रहातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अमरावती येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.
या जंगल सत्याग्रहाची स्मृती कायम राहावी यासाठी रामदेवबाबा मूकबधिर विद्यालय परिसरात यवतमाळ रोड लगत जंगल सत्याग्रह स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे. परंतु हा स्तंभ व परिसर अतिशय जीर्ण अवस्थेत उभा आहे. या स्मृती स्तंभाचा परिसर विकसित करून त्याचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत हे स्थळ व वणी शहरातील अन्य स्मृती स्तंभ विकसित करण्यात यावे अशी मागणी येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्मृती स्तंभ समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे व निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी या मागणीला सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. निवेदन देतांना या समितीचे अध्यक्ष हरिहर भागवत, सचिव अंबर घरोटे मार्गदर्शक मेघराज भंडारी व गजानन कासावार उपस्थित होते.