तिर्थक्षेत्र आळंदीत नगरपरिषदेच्या वतीने आरआरआर केंद्र सुरू.

 

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : आळंदी नगरपरीषदेच्या वतीने आळंदी शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आरआरआर केंद्राचा प्रारंभ आरोग्य विभाग प्रमुख मालन पाटोळे व प्रज्ञा सोनवणे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला असून, या उपक्रमाचा फायदा गरजूंना व गोरगरिबांना होणार आहे असे पाटोळे यांनी सांगितले आहे.

 

केंद्र सरकारच्या मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर या अभियानांतर्गत आरआरआर सेंटर (रिड्युस, रियूज, रिसायकल) सुरू केले आहे. या सेंटरमध्ये आपल्याजवळ किंवा घरात असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुने कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या सेंटरमध्ये जमा करण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या करण्यात आले आहे.

 

आरआरआर केंद्रात जमा झालेल्या सर्व वस्तू या गोरगरिबांना व गरजूंना देण्यात येतील. जेणेकरून ते या वस्तू वापरू शकतात. हे सेंटर आळंदी येथील जुन्या नगरपरिषद येथे कार्यालयीन वेळेत सुरू राहील, असे आरोग्य विभाग प्रमुख मालन पाटोळे यांनी सांगितले.

आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू जसे जुनी पुस्तके, भांडी, खेळणी फेकण्यापेक्षा आम्हाला आणून द्या, त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला या वस्तू मिळण्यास मदत होईल व त्या व्यक्तीच्या उपयोगात येतील. यासाठी आळंदी शहरातील नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे.