भारतात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण संत विचारांमुळे झाले : प्रा.श्रीधर घुंडरे 

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : “सुमारे साडेसातशे वर्ष मुस्लिम आणि इंग्रजी राजवटी भारतात असूनही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण संत विचारांमुळे झाले. देशात शांती, सलोखा आणि सामाजिक समता संतांनी निर्माण करून विश्वशांतीचा संदेश जगाला दिला, असे प्रतिपादन प्रा.श्रीधर घुंडरे यांनी आपल्या मनोगतातून मांडले.

         आळंदी येथील वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आयोजित युवा विद्यार्थ्यांसाठी युवा सबलीकरण शिबीरात विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.यावेळी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्रा.श्रीधर घुंडरे यांचे “पारतंत्र्यातील भारतात, स्वधर्म व संस्कृती रक्षणासाठी संत विचारांचे योगदान ” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी हभप सुभाष महाराज गेठे, दिगंबर ढोकले, डॉ.रोहीदास आल्हाट, डॉ.संदीप कवडे, दिगंबर काष्टे तसेच विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

      यावेळी श्रीधर घुंडरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ‘आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. या भूमीत जन्म घेतलेल्या समाजाला संतांपासून संस्कारक्षम, शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला. संस्कारांचा संपन्न वारसा या भूमीनं मराठी मनाला दिला. त्यामुळे मराठी मनाचा कणा ताठ झाला. महाराष्ट्रात संत-परंपरेची मौक्तिकमाला आहे. संत म्हणजे साक्षात देव. जगाच्या कल्याणासाठी विधात्यानं संतांना इहलोकी पाठविलेलं असतं. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह झिजवीती ऊपकारे |’ हे संतांचे मुख्य लक्षण आहे.

      संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे. या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. संतांनी मानवतावादाची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘जनी जनार्दन’ हा त्यांचा सहज भाव. संत हे समाजापुढील आदर्श असल्यामुळे त्यांचं जीवन समजून घेण्याची ओढ प्रत्येक मनाला वाटते. अनासक्त माणूस लोकोद्धाराचं केवढं प्रचंड कार्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली महाराष्ट्रातील संत-परंपरा ! खरंच महाराष्ट्रातील संतमंडळी म्हणजे आपल्या संस्कृतीचे कळस ! आहे असे घुंडरे यांनी सांगितले.