शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही : अविनाश धर्माधिकारी 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांपर्यंत वेगाने माहिती पोहोचविणे शक्य आहे, परंतु शिक्षक देत असलेले ज्ञान आणि जीवनातील शहाणपण कोणतेही नवीन तंत्रज्ञान देऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही, असे मत निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जिज्ञासा’ या शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत धर्माधिकारी बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा.धनंजय कुलकर्णी, प्रबंधिका डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्माधिकारी पुढे म्हणाले, उत्तम मनुष्य निर्मितीसाठी उच्च बुद्धिमत्तेच्या व्यक्तींनी शिक्षकी पेशात आले पाहिजे. एक एक शिक्षक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे.

शिकवण्यावरील जबरदस्त प्रभुत्व, मुलांना वेड लागेल असे शिकविण्याचे कौशल्य, सतत अद्ययावत राहण्यासाठी चतुरस्त्र वाचन, लेखन, संशोधन, अनुभवातून अभ्यासात स्वतंत्र बुद्धिने अभ्यासात नवीन भर घालण्याची क्षमता आणि विद्यार्थ्यांवर निरपेक्ष प्रेम करता येणे ही पंचशीले शिक्षकांनी अंगी बाणवली पाहिजेत.

राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या सचिव अनुराधा ओक, शिक्षक प्रशिक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केशव भांडारकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.