मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची चुरस वाढली… — बाजी कोण मारणार? — आघाडी की भाजप?

 

       रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी 

      यवतमाळ/वर्धा 

मारेगाव: मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस आता अधिक वाढली असून काँग्रेस सेना समर्थीत महाविकास आघाडी तर भाजप, शिंदे गट मिळून लढत असून दोन पॅनेल एकमेकांसमोर ठाकल्या आहेत.

        भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल असून महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी एकता पॅनल अशी चुरशीची लढत होणार आहे. 

           बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन होऊन सहकार क्षेत्राची कमान हातामध्ये राहण्यासाठी राजकीय पक्षांचे मुत्सद्दी राजकीय डावपेच आखण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.

        मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे मतदान 30 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीत एकूण 91 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यापैकी 11 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाले. तर 46 उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे उर्वरित 34 उमेदवारी अर्ज कायम राहिले. 

         यात अनुसूचित जाती जमातीमध्ये एकच अर्ज कायम राहिल्याने विश्वनाथ आत्राम हे एकच नाव राहिल्याने या प्रवर्गातील जागा बिनविरोध निघण्याच्या मार्गांवर आहे. तर सहकारी संस्था गटामध्ये महिला राखीव मधून 2 जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज कायम आहे. सहकारी संस्थागटामध्ये एकूण 11 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदार संघात एकूण 7 जागा असून एकूण 14 अर्ज आलेले आहे. इतर मागासवर्गमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे. महिला प्रतिनिधी वर्गात दोन जागेसाठी तीन अर्ज कायम आहे. अनुसूचित जमाती मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.

         ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सर्वसाधारणमध्ये दोन जागेसाठी चार उमेदवारी अर्ज कायम आहे. आर्थिक दुर्बल घटकमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम असून अनुसूचित जातीजमाती मतदार संघामध्ये एका जागेसाठी एकच अर्ज कायम आहे. व्यापारी अडते मतदार संघामध्ये दोन जागेसाठी चार उमेदवारी कायम आहे. तर हमाल मापारी मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.

         या निवडणुकीत काँग्रेस सेना समर्थीत महाविकास आघाडी तर भाजप, शिंदे गट मिळून लढत आहे. सध्या दोन्ही पॅनल तुल्यबळ वाटत असले तरी शेवटी कोण बाजी मारणार हे येणारा काळच सांगेल.