
ऋषी सहारे
संपादक
आरामोरी :– युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा उपाध्यक्ष सारंग जांभुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील गटबाजी, अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा , आंतरिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि सोबतच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेल्या पत्रात यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जांभुळे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी NSUI पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि गेल्या आठ वर्षांत संघटनेसाठी मेहनतीने काम केले. मात्र, स्थानिक काँग्रेसमध्ये कुठे तरी आपल्या जातीच्या, नेतृत्वाचा की कशाच्या आधारे आपल्याला बाजूला केल्या जात आहे असा प्रश्न त्यांना आहे.
ठराविक गटच नेतृत्व काबीज करत आहेत. तालुका काँग्रेसच्या पॅरेंट बॉडी मध्ये गटबाजी चालली आहे, आणि त्यावर नियंत्रण आणण्याऐवजी ती अधिकच प्रोत्साहित होत असल्याचे दिसते. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी याबाबत वेळोवेळी सावध केले असूनही त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
स्थानिक काँग्रेसमध्ये अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांना , कार्यकर्त्यांना केवळ मतांसाठी वापरले जाते. परंतु निर्णयप्रक्रियेत त्यांना संधी दिली जात नाही. संघटनेचा काँग्रेस कमिटी पेरेंट बॉडी चा अध्यक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि पक्षाला बळ देणारा असावा, अशी अपेक्षा असते.
परंतु आरमोरी तालुका काँग्रेसमध्ये याच्या उलट परिस्थिती आहे.निवडणुकीच्या तोंडावर दलित समाजाच्या भावना हाताळल्या जातात, मात्र त्यांचे स्थानिक संघटनेतील खरे नेतृत्व संपवण्याचा हा डाव असल्याचा भीती त्यांना भासली आहे.गटबाजी आणि आंतरिक अडचणींमुळे संघटना योग्यरित्या काम करू शकत नसल्याची खंत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली की, जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर काँग्रेस पक्ष मूलभूत स्वरूपात कमकुवत होईल आणि तालुका काँग्रेस कमिटी मध्ये मोठे बदल करून अनुसूचित जातीला न्याय देण्याची मागणी केली आहे.