श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे जे.ई.लसीकरण पूर्ण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- जपानी एन्सेफलाइटिस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जे.ई लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालवाडी ते नववीच्या २१५२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले अशी माहिती संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी दिली.

         या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या 70 टक्के लोकांना न्यूरोलॉजिकल अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते. हा भविष्यातील धोका ओळखून पाच ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.‌

        आळंदी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.ऋषिकेश फुंदे, अनिल गुंजाळ, बसवंत बहिरगोंडे, देवशाला चाटे, पल्लवी साठे, पुष्पा अंभुरे या सर्व डॉक्टर आणि नर्सच्या माध्यमातून विद्यालयातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे पालकांच्या संमतीने लसीकरण करण्यात आले.

          या मोहिमेचे नियोजन ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, आरोग्य विभागाच्या प्रमुख राजश्री भुजबळ, पूजा चौधरी यांनी केले.