पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायती रेती घाट कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतीने उभारलेल्या विद्युत खांबावरील दिवे बदलून चक्क आपल्या मनमर्जीने हायहोल्टेज दिवे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतरही ग्राम विकास अधिकाऱ्याने कोणतीही तक्रार न केल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संदर्भात सावंगीचे उपसरपंच सुमंत मेश्राम यांच्यासह इतर ग्रा.प. सदस्यांनी यांनी तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी देसाईगंज, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील सावंगी येथे रेती घाट बेस डेपोचा लिलाव झाला असुन याचे कंत्राट जी. एच. बलवानी बिल्डींग मटेरीयल सप्लायर यांना देण्यात आले आहे.
सावंगी चौकाचा मुख्य रस्ता ते मेंढाटोली नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने विद्युत खांबावर 20 व्हॅटचे दिवे लावले होते, ते दिवे काढून रेतीघाट कंत्राटदाराने ग्रामपंचायत वा शासनाची कोणतीही परवानगी न घेता चक्क 250 व्हॅटचे हॅलोजन दिवे लावल्याचा प्रकार उघडकीस आला.
ग्रा. पं. सदस्यांनी मासिक सभेत सरपंच प्रभा ढोरे यांना विचारणा केली असता मी माझ्या अधिकाराचा वापर केला असे उत्तर दिले. खरे पाहता ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सदर विषयाचे ठराव घेणे सबंधित विभागाला मागणी पत्र पाठविणे निविदा प्रसारीत करणे या सर्व प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. मात्र कोणतीही प्रक्रिया पार न पाडता नियम धाब्यावर बसवुन केवळ रेती घाट धारकास लाभ पुरविता येईल.
या हेतुने हा प्रकार करण्यात आल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावंगीचे उपसरपंच सुमंत मेश्राम, ग्रा. पं. सदस्य तौसिफ एजाज कुरेशी, रजनिकांत गुरनुले, देवानंद बन्सोड, शालिनी मेश्राम यांनी पत्रपरिषदेतून केली.
1) या संदर्भात सावंगी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी लांजेवार यांना मोबाईल संपर्क केला असता त्यांनी सांगितले, मला पुसट पुसट माहिती मिळाली. पण या संदर्भात पूर्ण कल्पना नाही.
2) यासंदर्भात सावंगीच्या सरपंचा प्रभा ढोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.