भारतीय  संविधान आणि आपले मुलभूत हक्क व अधिकार…

             26 जानेवारी हा दिन ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून संपूर्ण देशामध्ये आज आनंदोल्हासात साजरा करीत आहोत. कारण याच दिवसाने भारतीयांच्या जीवनात मानसाचे माणूसपण निर्माण करुन सर्वांना स्वातंत्र्य बहाल  केल आहे. म्हणून ह्या राष्ट्रीय उत्सवाचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्य साधारण आहे. 

             भारतीय गणराज्य हे जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रजासत्ताक आहे. भारत देश हा विविध जाती धर्माचा देश आहे. याची विशेषता म्हणजे विविधतेतून एकता निर्मान करणारे भारत हे एकमेव महान राष्ट्र आहे.  या महानतेच रहस्य शोधले तर ते आहे ‘भारतीय संविधान.’ याच संविधानाने जगाला समता, स्वातंत्र्य ,बंधुता देवून मोलाचा संदेश दिला आहे. आणि भारताने जगाच्या इतिहासात आपल्या नावाचा आदर्श देश म्हणून ठसा उमटवला आहे.

            तद्वतच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान ज्ञानसूर्याची  भारतीय संविधानाचे  शिल्पकार म्हणून जगाला ओळख झाली आहे.

            संविधान लिहिताना या महान शिल्पकाराने सर्व गोष्टीचा विद्वत्तापूर्वक अभ्यास करुन सर्व मानव जातीच्या कल्याणकारी जीवनाचा सारासार विचार  करून सर्वांना समान  हक्क, अधिकार,आणि स्वातंत्र्य देऊन प्रत्येकावर कर्तव्याची जबाबदारीही टाकली आहे.  प्रत्येक नागरिकास समाधानाने आणि स्वाभिमानाने कसे जगता येईल, याची काळजी घेतली आहे. याबरोबरच सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार देऊन आपला प्रतिनीधी निवडण्याचा फार मोठा विशेष अधिकार प्राप्त करून दिला आहे. आणि लोकांचे राज्य निर्माण केले आहे. म्हणजे  लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य होय. यालाच ‘लोकशाही’ म्हणतात.

            विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या संविधानाची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्यापासून केलेली आहे. आणि ते संविधान भारतीयांनाच अर्पण केले आहे. यातूनच भारतीयांची महानता आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी आपणास लक्षात येईल.म्हणूनच हा देश जगात आदर्शवत ठरला आहे. येथील लोकशाही ईतर देशापेक्षा महत्त्वपूर्ण ठरली आहे.

           भारत देशाच्या संविधानाचे महत्त्व व विशेषता पुढील तुलना केलेल्या देशातील राज्य घटनेवरून आपणास नक्कीच होईल.

            अमेरिकेची राज्यघटना  फक्त 7 कलमांची आहे.या राज्यघटनेस लिहिण्यासाठी 4 महिने इतका अवधी लागला आहे. कॅनडाची राज्यघटना  147 कलमांची आहे. तिला 2 वर्षे 5 महिने लागले.  ऑस्ट्रेलियाची राज्यघटना 128 कलमांची आहे. त्याला 9 वर्ष लागले आहेत.  द.आफ्रिका येथील राज्यघटना 153 कलमांची आहे. तिला एक वर्ष कालावधी लागला आहे.

            या तुलनेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना 395  कलमांची लिहिलेले आहे. तिला 2 वर्षे 11महिने 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे.

        आणि म्हणून ही  जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ठरलेली आहे.

           हे जतन करण्याची आणि तिची महानता वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. 

          या संविधानाने भारतीय नागरिकांस काय दिले,हे जर आपण पाहिले तर आपण फक्त आपले मुलभूत हक्क आणि अधिकार हे जरी समजून घेतले तर या संविधानाचे माणसाच्या भावी जीवनासाठी किती मोठे योगदान आहे ते आपणास नक्कीच दिसून येईल.म्हणून आपण आपले संविधान वाचले पाहिजे, तरच त्याचे महत्त्व आपणास कळून चुकेल.

       यासाठी आपण हे आपले अधिकार समजून घेणे आवश्यक आहेत.

आपले मुलभूत हक्क,समानतेचा हक्क

           कायद्यापुढे समानता- राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.

          समान कामासाठी समान वेतन हे हा सिद्धांत,जे सर्व बाबतीत समान स्थानावर आहेत,अशा व्यक्तींसाठी समान कामासाठी समान वेतन देण्यासाठी लागू आहे.

 १५.धर्म,वंश,जात,लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई-

१) राज्य,कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल,अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही.

१६) सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी-

  १) राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल.

          कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग,कूळ, जन्मस्थान, निवास या किंवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवायोजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही,अथवा त्यांच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही.

१७) अस्पृश्यता नष्ट करणे- 

अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे.’अस्पृश्यते’तून उद्भवणारी कोणतीही निःसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

१८) किताब नष्ट करणे-

१) सेवाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही.

२) भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही.

३) भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती, ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही.

१९) भाषण स्वातंत्र्य, इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण-

क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क;

ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क;

ग) अधिसंघ किंवा संघ (किंवा सहकारी संस्था) बनवण्याचा;

घ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा;

ड) भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा;

छ) कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय,व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क असेल.

२०) अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण-

१)जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधांबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही,तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती,त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही.

२) एकाच अपराधांबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा केली जाणार नाही.

३)कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुध्द साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.

२१)जीवित व व्यक्तीगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण-

कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तीगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.

२२) विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण-

१)अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा अटकेची कारणे, शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधी-

व्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही.

२३) शोषणाविरुद्ध हक्क-

माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई-

१) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

२४) कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई- 

चौदा वर वयाखालील कोणत्याही बालकांस, कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही.

धर्मस्वातंत्र्याचा हक्कः

२५) सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार

१) सार्वजनिक सुव्यवस्था, नितिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने, सद्सद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत.

२६) धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य-

   सार्वजनिक सुव्यवस्था,नितिमत्ता व आरोग्य यांच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास-

क) धार्मिक व धर्मदायी प्रयोजनाकरितां संस्थांची स्थापना करून त्या स्व-खर्चाने चालवण्याचा;

ख) धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा;

ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा.

घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

२७) एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य-

ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी विनिर्दिष्टपणे विनियोजीत केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही.

२८) विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य-पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

२९) अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण-

         भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा,लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.

३०)अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क-धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे मौल्यवान  मुलभूत अधिकार आणि हक्क सहानुभूतीपूर्वक समजून घेऊन ते प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. तेव्हाच  भारताच्या संविधानाने आपल्याला खरंच काय दिले हे कळेल. आणि प्रत्येक नागरिक समाधान मानेल.संविधानाने आम्हाला खूपकाही दिले,हे मानून आपले कर्तव्य बजावील.यामुळे नक्कीच देश प्रगतीकडे वाटचाल करेल.लोकशाहीचे महत्त्व वाढेल. देशाचे अखंडत्त्व टिकून राहील. देश सुजलाम सुफलाम होईल आणि हीच यशाची विकसनशील वाट महासत्ताकाच्या  दिशेने   जाईल . प्रत्येकाने संविधान वाचन करावे. संविधानाचा जागर करावा. संविधान प्रास्ताविकेचे कार्यक्रमातून वाचन करावे.त्यातील प्रत्येक मौल्यवान शब्दांचा अर्थ समजून घ्यावा. 

‘आम्ही भारताचे लोक’ हे वाक्य उच्चारतांना नक्कीच आपली छाती अभिमानाने भरुन येईल. त्यातील प्रत्येक शब्द आपणास राष्ट्रीयत्वातील एकतेच बळ,स्फूर्ती आणि प्रेरणा देईल. आणि आदर्श नागरिक घडेल.

यातून संविधानाचे महत्त्व वाढीस लागेल. संविधानाची मूल्ये जपले जातील. देशभक्ती वाढेल. देश समृध्द होईल. आपल्या हातून राष्ट्र कार्य घडेल आणि लोकशाही आनंदाने नांदेल..

शेवटी समारोप करताना एवढच म्हणेल… 

आजदिनी संकल्प करु

एकतेची कास धरु

घरघर संविधान नेऊ

लोकशाही मजबूत करु

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

        बाबुराव पाईकराव

सहशिक्षक कै.बापूराव देशमुख मा.व उ.माध्य वि.डोंगरकडा

9665711514