दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

 

      पुणे : २६ जानेवारी २०२२ रोजी पुनर्रोपणाद्वारे साताऱ्यात जीवदान मिळालेल्या हडपसरच्या वडाचा २६ जानेवारी २०२३,प्रजासत्ताक दिनी पहिला वाढदिवस साजरा केला जाणार असून राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे कार्यकर्ते अनोखी मानवंदना देणार आहेत.’सह्याद्री देवराई’ आणि सातारा पोलीस निर्मित, संचलित सातारा बायोडायव्हर्सिटी पार्क ,म्हसवे येथे प्रजासत्ताक दिनी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या अनोख्या सोहळ्यात सातारा व परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत. 

       सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला यश एक वर्षांपूर्वी यश आले ! वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून प्रजासत्ताकदिनी या राष्ट्रीय वृक्षाचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. 

      सहयाद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘ अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान,म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.वाढ होत आहे. सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचा वाढ दिवस साजरा करणार आहोत. रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. शंभर वर्षाचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे , म्हणून त्याचे सन्मानाने २६ जानेवारी २०२२ रोजी म्हसवे ( सातारा ) येथे पुनर्रोपण करण्यात आले’.

      सहयाद्री देवराई  चा ध्यास

आतापर्यंत साधारण २९ देवराई , १ वृक्ष बँक , १४ गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान सुमारे १० लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सह्याद्री देवराई या संस्थेनं वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे.साताऱ्यातही दुर्मिळ झाडांचे जैवविविधता उद्यान तयार केले जात आहे. उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील ६०० च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या ३० एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे.राज्यात ठिकठिकाणी रॉक गार्डन,कॅक्टस गार्डन,ऑर्किड गार्डन ,बोन्साय गार्डन उभारण्यात येत आहे. विविध प्रजाती,गवत,वेली जपली जात असून पुढच्या पिढयांसाठी हा वारसा पुढे नेला जात आहे.आधुनिक तंत्राने वृक्ष स्वतःची माहिती सांगतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे ५०० वृक्षांना आतापर्यंत क्यू आर कोड तयार करून लावले गेले आहेत. पश्चिम घाटात उगवणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती या देवरायांमध्ये जतन करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com