सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
आजकाल अनेकांना वेगवेगळा छंद जोपासण्याची जणू सवयच जडली आहे. असाच एक अवलिया सावली शहरात आहे. प्रशांत नेमचंद तावाडे असे त्याचे नाव. त्याला स्वच्छतादूत म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी गौरविले आहे. शासकीय कार्यालयातूनही अनेकदा सत्कार करण्यात आला आहे.
प्रशांत हा गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतादुताचे कार्य अव्याहतपणे करतो आहे. जिथे जिथे त्याच्या नजरेस कचरा दिसेल, तेथील परिसर स्वच्छ करण्यात तो तत्पर असतो. संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या कार्याचा वसा त्याने स्वयंप्रेरणेने स्वीकारला आहे.
कोणताही मोबदला न घेता परिसर स्वच्छ करण्याची सवयच झाली असल्याचे त्याच्या कार्यातून जाणवते. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मिळेल ते काम करून कुटुंबाचा प्रपंच चालविण्यातही तो मागे नाही. कुठल्याही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका घरोघरी जाऊन वाटणे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.
विशेष म्हणजे परेश तावाडे यांचा विविध सामाजिक संघटना व संस्थेतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला आहे,सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते परेश उर्फ प्रशांत तावाडे हे निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करतात विविध सामाजिक उपक्रमातुन जनजागृती करण्यासाठी समोर येत असतात, युवा पिढीसाठी परेश तावाडे यांचे कार्य प्रेरणादायी आहेत