ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली:- शासनाने स्वच्छतेला फारच महत्व दिले आहे.केंद्र शासनाने स्वच्छता मिशन राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा देश तयार करण्याचा विडा उचलला आहे.राज्य शासनाने देखील संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा,स्वच्छता पंधरवडा अशा विविध योजनांच्या माध्यमातून स्वच्छता ही कशी आवश्यक बाब आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी,आचार्य विनोबा भावे यांनी देखील सर्वोदयी चळवळीच्या माध्यमातून आपणच आपल्या गावाचा स्वच्छतेतून समृद्धीकडे या ध्येयाने प्रवास घडवू शकतो.
त्यासाठी सुदृढ समाज घडला पाहिजे आणि आपण गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले व त्याची सुरूवात आपल्या घरापासून केली तर रोगराईपासून ग्राममुक्ती साध्य होवू शकते. मात्र केवळ विशिष्ट प्रसंगी ग्रामस्वच्छतेला महत्व दिले आणि नंतर गावात उकिरड्याचे ढीग साचू दिले तर हे अजिबात शक्य नाही.
त्यासाठी जनतेने स्वच्छते विषयी सदैव जागृत असावे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, सर्वोदयी नेते व विश्वशांती मिशनचे अध्यक्ष अँड.एस.व्ही. हलमारे यांनी साकोली येथे केले.
साकोली येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित विश्वशांती मिशनच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की आम्ही तोच विचार घेवून गेल्या चाळीस वर्षापासून प्रातिनिधिक स्वरूपात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांच्या वेळी तसेच गणेशोत्सव,दुर्गोत्सव,शिवजन्मोत्सव,गांधी जयंती अशा प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये,ग्रामपंचायती, गुरूदेव सेवा मंडळे,विविध महीला व पुरूष भजनी मंडळे, अधिकारी,पदाधिकारी यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे आवाहन करत असतो.यामुळे अनेक लोक स्वच्छता अभियानात सहभागी होतात त्या सर्वांचे अभिनंदन.
यातून जनतेच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम जागृत होते,समाजप्रेम जागृत होते.ही जागृती होणे गरजेचे आहे.या उपक्रमातून प्रेरणा घेवूनच विविध ग्रामस्वच्छता अभियान शासनाच्या वतीने चालविले जावू लागले.अखेर याची दखल केंद्रशासनाने घेतली व या अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
आज अनेक गावे हागणदारीमुक्त झाली आहेत असे प्रतिपादन हलमारे यांनी केले.
विश्वशांती मिशनच्या कार्याविषयी बोलतांना ते म्हणाले की आज जगात अशांती आहे.आधीच आपला देश व संपूर्ण जग आतंकवाद्यांच्या कारवायांमुळे त्रस्त असतांना आज रशिया व युक्रेन यांच्यात गेले वर्षभर युद्ध सुरू आहे. त्यात भर म्हणून गाजा पट्टीत इस्त्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू झाले.यातून अनेक देशांंना झळ पोहोचते.आज अनेक देश अण्वस्त्र सज्ज आहेत.या घातक अस्त्रांचा वापर झाल्यास जगाचे अस्तित्व धोक्यात येवू शकते. युद्ध हा कुठल्याही समस्योवरील तोडगा होवूच शकत नाही.त्यातून लाखो निरपराध लोक मारले जातात.प्रचंड वित्तहानी होते. जगाचा विकास खुंटतो.
म्हणून जगात शांती नांदावी,आतंकवाद,दहशतवाद, नक्षलवाद संपवावे अथवा कोणतेही युद्ध होवू नये,या दृष्टीने आम्ही गतवर्षी जवळपास जगातील साठ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना विश्वशांती मिशनच्या माध्यमातून पत्रे लिहिली आहेत.
जगाचा विकास हा शांतीच्या मार्गानेच होवू शकतो हे त्यात आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन यावेळी अँड.हलमारे यांनी केले.
यावेळी विश्वशांती मिशनचे रंजना हलमारे,अमोल हलमारे, सुरेश गोमासे,दर्याव डोंगरे,सूर्यभान चेटूले,बाळकृष्ण दोनोडे,विनायक मारवाडे,सुजाता गोमासे,जयदेव चौधरी,सेवकराम बावनकर,ओमप्रकाश भुते,किरण भुरे,माधव वालदे,पुरूषोत्तम पंधरे,प्रभाकर चांदेवार,पुनेश्वर सेलोकर,ताराचंद कापगते,सविता मारवाडे,प्रल्हाद भुते,डेनी घरडे,दर्शना गहाणे,विनोद बन्सोड,जगण भानारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.