चंद्रपुर सिंदेवाही
प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाहीः विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी विभागीय कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग, सिंदेवाही (चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कृषि मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र” कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, लाभले. कुलगुरू महोदयांनी शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, पिकाचे उत्पादन दुप्पट केल्यास ३३ टक्के उत्पन्नात वाढ होते, उत्पादन खर्चात ५० टक्के कपात केल्यास ३३ टक्के उत्पन्न वाढते आणि उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया , ब्रेडींग आणि मार्केटींग करणे याद्वारे ३३ टक्के उत्पन्नात वाढ होते , या त्री सुत्री तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा असे संबोधित केले. तसेच एकात्मिक पीक पध्दती सोबतच शेतीपूरक उद्योगामध्ये मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, शेळीपालन, फळबाग व भाजीपाला लागवड या घटकांचा समावेश करावे असे सूचविले आणि कृषि संबंधी आदर्श गांव विकसीत करण्यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभागानी एकत्र येवून ‘मॉडल व्हीलेज’ ची संकल्पना तयार करून इतरांना त्या गांवाचे अनुकरण व प्रोत्साहित करण्याकरीता तसेच ‘एक गांव एक वाण’ या संकल्पनेवर विशेष करून भर द्यावा असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून मा. श्री. स्वप्नील कावळे, अध्यक्ष, नगर पंचायत, सिंदेवाही व मा. सौ. सोनाली पेंदाम, सरपंच, ग्रामपंचायत, गडमौशी, प्रमुख उपस्थिती मध्ये मा. डॉ. धनराज उंदिरवाडे, विस्तार शिक्षण संचालक, मा. संशोधन संचालक यांचे प्रतिनिधी मा. डॉ. डी. टी. देशमुख, सहयोगी संचालक डॉ. पंदेकृवि, अकोला, मा. श्री. भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर हे होते. तसेच डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, डॉ. गौतम शामकुवर, प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र व मा. श्री. रमाकांत लोधे, प्रगतशिल शेतकरी, रत्नापूर, मा. सौ. वर्षाताई लांजेवार, महिला प्रगतशिल शेतकरी व मा. श्री. सचिन नाडमवार, माजी सरपंच, गडमौशी हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविका मध्ये डॉ. अनिल कोल्हे यांनी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या धान पिकाच्या विविध वाणाबद्दल, धान पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, बिज प्रक्रियाचे महत्व तसेच दुबार पिक पद्धत व पिकांची फेरपालट आणि चांदा ते बांदा या प्रकल्पांतर्गत यांत्रिकीकरणाचे विविध कृषि यंत्रे / अवजारे विषयी सखोल मार्गदर्शन केले. श्री. स्वप्नील कावळे यांनी शेतकरी बांधवानी कृषि मेळावे, कृषि मेळावा व चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवून या ज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करावे असे मत व्यक्त केले. डॉ. भाऊसाहेब ब-हाटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतक-यांनी एकच पीक न घेता बहुपिक पध्दतीकरीता विद्यापीठ तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवावे असे सूचवून शेतक-यांसाठी शासनातर्फे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया या योजने बाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी मार्गदर्शनामध्ये शेतक-यांचे जिवनमान उंचावण्याकरीता दुबार पीक पध्दतीचा प्रसार व प्रचार करून तेलबिया पिकामध्ये करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल, कडधान्य पिकामध्ये हरभरा, उन्हाळी मूग या सोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय याचा शेतकरी बांधवानी अवलंब करून कृषि उन्नतीमध्ये भरभराट करावी असे सूचवून रबी हंगामाच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. श्री. रमाकांत लोधे यांनी आपल्या शेतावर पीडीकेव्ही तिलक या धान वाणांच्या वापरामुळे तसेच तीन टक्के मिठाच्या द्रावणाचे बिजप्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे आवर्जून सांगून शेतक-यांनी या वाणाचा मोठया प्रमाणात अवलंब करावा असे प्रतिपादन केले. मा. सौ.वर्षाताई लांजेवार यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब व अनुभव तसेच शेतकरी बांधवानी कच्चा माल विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास नक्कीच उत्पन्नात दुप्पट वाढ होईल असे सूचवून बचत गटामार्फत उल्लेखनिय कार्याला उजाळा दिला. प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतक-यांना धान कापणी व मळणी यंत्रावे प्रात्यक्षिक, कापणी यंत्र, धानाचे धसकटे बारीक करण्याकरीता व रबी पिकाची पेरणी सुलभ होण्यासाठी स्लॅशर यंत्र, बीबीएफ यंत्राने रबी पिकाची पेरणी यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यांत आले. तसेच प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या डॉ.पंदेकृवि, अकोला अंतर्गत विकसीत केलेल्या धान वाणांचे प्रात्यक्षिकासंबंधी माहिती डॉ. गौतम शामकुवर यांनी दिली. सोबतच कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यांत आले व मोठया प्रमाणात शेतक-यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते कृविके, सिंदेवाही आणि कृषि विभाग तर्फे राबविण्यांत येणा-या रब्बी पिकाचे प्रात्यक्षिकासाठी विविध पिकाच्या बियाण्यांचे वितरण करण्यांत आले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये श्री. संदिप क-हाळे, वरिष्ठ शात्रज्ञ व प्रमुख व श्री. पुष्पक बोथीकर, विषय विशेषज्ञ, कृविके, गडचिरोली यांनी रब्बी पिकाची यांत्रीकीकृत शेती आणि रब्बी पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी तर डॉ. मदन पांढरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय कृषि संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.