रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर : रावण आमचा देव असल्याने कुठल्याही परिस्थितीत घुग्गुसमध्ये रावण दहन करू नये,अशी भूमिका आदिवासी बांधवानी घेतली व विरोध करण्यासाठी मोर्चा काढला.
यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.घुग्गुस शहरातील शांतता व सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले व तणाव स्थिती लक्षात घेता दंगा नियंत्रक पथकाला पाचरण केले.
दसरा व धमचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आहेत.
घुग्घूस शहरात सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान आदिवासी समाज बांधवांनी रावण दहन निर्माण होत असलेल्या प्रतिमेचे निर्माण करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक आसिफराजा व पोलीसदलाने आदिवासी समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले.
चंद्रपूर वरुन दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले.शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत आहे.
आज शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची रैली निघणार असून विजयादशमी असल्याने पोलिसांवर या घटनेचा प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे.
शहरातील आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला असून रावण दहन केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्घुस शहरात निषेध मोर्चा काढला.
या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.तर बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले,दंगा नियंत्रण पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
अहंकारी,पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते.विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे.त्यानुसार देशातील काही भागात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात.
रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून ते चारित्र्य संपन्न होते व सर्व प्रजेचे ते तारणहार होते.यामुळे त्यांचे दहन करू नये अशी आदिवासी समाजाची मागणी आहे.