२०२१ च्या कृषी पुरस्कारांना अखेर मिळाला मुहूर्त: वित्तविभागाची मंजूरी…  — युवा शेतकरी अनिल किरणापूरेंचा मुंबईत २९ ला सत्कार… 

  संजय टेंभूर्णे 

कार्यकारी संपादक

           कृषी विभागातर्फे देण्यात येणारे मागील तीन वर्षापासूनचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार येत्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी वितरित करण्यात येणार आहेत. कृषी पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ केल्यानंतर होणारा हा पहिलाच कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे.

             कृषी पुरस्कारांची रक्कम याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून मुंबईत प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. परसोडी क्षेत्राचे पं.स.सदस्य व लवारी येथील युवा व नवोपक्रमशील शेतकरी अनिल शिवलाल किरणापूरे यांना मुंबई येथे २०२१ च्या राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

       वित्त विभागाने मागील आठवड्यात या पुरस्कार सोहळ्यासाठी आवश्यक ९ कोटीच्या फाइलला मान्यता दिल्यानंतर बुधवारी दि. १८ सप्टेंबर रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निमंत्रण दिले. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.

            राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे २०९ पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. मात्र त्यांचे वाटप करण्यात आलेले नाही.

           याआधी कृषिरत्न पुरस्कारासाठी ७५ हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी ५० हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी ३० हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या काळात झालेल्या कृषी पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुरस्कार हे तिप्पट रकमेचे असतील.

वित्त विभागाने घेतले होते आक्षेप

      कृषी पुरस्कार सोहळ्यातील काही घटकांवर वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतले होते. वाढत्या महागाईच्या काळात प्रवास आणि इतर भत्त्यांत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी देता येणार नसल्याचा पवित्रा वित्त व नियोजन विभागाने घेतला होता. या बाबतचे वृत्त ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यावर कृषी क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर वित्त व नियोजन विभागाने या फाइलला मंजुरी दिल्याने पुरस्कार वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरळी मुंबईच्या ‘एनएससीआय’मध्ये कार्यक्रम

     कृषी पुरस्कार वितरण सोहळा दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’मध्ये होणार असून यासाठी मोठी तयारी कृषी विभागाने केली आहे. या सोहळ्यासाठी एक इव्हेंट कंपनी निश्चित करण्यात आल्याचे समजते.

            राज्यपालाचे हस्ते मुंबईत होणार युवा शेतककरी अनिल किरणापुरे यांचा सत्कारपुरस्काराचे नाव- युवा शेतकरी सन 2021..