नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण सम्राट नंदलाल पाटील कापगते यांच्या 99 वी जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा लेख…..
नंदलाल पाटील कापगते यांचा जन्म 26 जून 1923 रोजी साकोली येथील कोहळी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पगाजी पाटील कापगते मालगुजार होते. पगाजी पाटील यांना तीन अपत्ये होती. थोरले शामराव पाटील ,मधले भैय्याजी पाटील आणि धाकटे नंदलाल पाटील. या तीन भावंडांपैकी शामराव पाटीलांनी राजकारण हे क्षेत्र निवडले तर मधल्या भैय्याजी पाटीलांनी कृषी क्षेत्राचा स्वीकार केला. धाकट्या नंदलाल पाटलांनी मात्र शिक्षणाचा विकास हेच ध्येय स्वीकारून साकोली व साकोली परिसरात शिक्षण संस्थांचे जाळे विणण्याचे अतिशय दुर्धर कार्य एखाद्या कोळ्याच्या निष्ठेने पार पाडून याबाबतीत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला.
नंदलाल पाटील यांनी आपले शालेय शिक्षण आटोपून 1948 मध्ये बी.ए.ची पदवी नागपूर येथे प्राप्त केली. 1951 मध्ये एल.एल.बी. ही वकिलीची पदवी देखील मिळवली. 1958 मध्ये बी.टी. ही अध्यापनाची पदवी प्राप्त केली. पण वकीलीपेक्षा आपण शिक्षण क्षेत्र निवडावे असा त्यांनी मनोमन निर्धार केला. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या झेंड्याखाली शिक्षणाच्या लहान रोपट्याला खतपाणी घालणे सुरू केले आणि पाटील साहेबांच्या अथक मेहनतीतून, परिश्रमातून शिक्षणाचा लहान रोपटा आज विशाल वटवृक्षाचे रूप धारण करून सेकंडरी एज्युकेशन सोसायटी ( नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली) ही जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात नावारुपास आलेली आहे. आज या संस्थेचे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात कला,क्रीडा, साहित्य ,सामाजिक व राजकीय क्षेत्रात उच्च पदावर नावलौकिक प्राप्त करीत आहेत.
झाडीपट्टीची रंगभूमी अवघ्या महाराष्ट्रात ख्यातनाम आहे या रंगभूमीला जसे ग्रामीण खेडुतांनी पोसले तसेच शालेय वातावरणाने परिपुष्ट केले ते नाकबूल करून चालणार नाही. सोसायटी हायस्कूल साकोली चे वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की, दोन नाटकांची मेजवानी हे समीकरण जवळजवळ ठरलेलेच असायचे.”यंदाच्या स्नेहसंमेलनासाठी कोणते नाटक निवडायचे?” हाच नंदलाल पाटील साहेबांचा पहिला प्रश्न असायचा. नाटकाशिवाय स्नेहसंमेलन ही कल्पनाच त्यांना पसंत नव्हती. स्नेहसंमेलनाच्या औचित्याने अनेक नाट्य कलाकृतीचा आस्वाद घेण्याची अनोखी संधी साकोलीकरांना त्याकाळी प्राप्त होऊ शकली. मराठी नाटकांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा नंदलाल पाटलांनी आयोजित साकोली येथील नाट्योत्सवाची नोंद इतिहासकारांना घेतल्याशिवाय पुढे जाताच येऊ शकणार नाही.
शासकीय नियमानुसार, नियतवयोमानाने 1983 ला नंदलाल पाटील कापगते हे सोसायटी (आजचे- नंदलाल पाटील कापगते विद्यालय ) साकोली चे प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झाले. मोठ्या व भारल्या व भरल्या मनाने त्यांनी आपला कार्यभार ज्येष्ठ शिक्षकांच्या हातात सोपविला. पाटील साहेब शाळेतून सेवानिवृत्त झाले तरी शालेय जीवनाशी आपली जुळलेली अतूट नाळ त्यांना तात्काळ कशी तोडता येणार? दररोज शाळेत येऊन बसणे, योग्य त्या सूचना देणे आणि आवश्यक ती कामे स्वतः पार पाडणे हे त्यांचे नित्याचेच असायचे. पटांगणावर उभे राहून ते आपण निर्माण केलेला भव्यदिव्य शाळेचा परिसर तृप्त नजरेने पाहत राहायचे.
आज शिक्षण क्षेत्रात नंदलाल पाटील सारख्या खऱ्या शिक्षणमहर्षी ची कमतरता जाणवत आहे. कारण नफेखोरीच्या व्यवसायिक लालसेने आज असंख्य शिक्षणसंस्था काढल्या जात आहेत. त्यातून ‘शिक्षण सम्राट’ उदयाला येत आहेत. त्यातून उद्योगपती, राजकारणी बनताना दिसताहेत. याबाबतीत पाटील साहेबांची भूमिका स्पष्ट होती, त्यांच्या मते, देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी स्वाभिमानी , कर्तव्यदक्ष, सुदृढ आणि निरोगी मनाची भावी पिढी हवी आहे. देशातील कोट्यावधी लोक निरक्षर असून अज्ञान अंधकारात चाचपडत आहेत, त्या सर्वांना सुशिक्षित आणि सुसंस्कारी बनवण्यासाठी “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही” म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकच म्हणून राहीन अशी त्यांची स्पष्ट सामाजिक भूमिका होती.
अखेरीस वृद्धावस्थेने त्यांना आपला इंगा दाखविलाच. पाटील साहेबांनी आता मनोमन प्रवासाची तयारी करायला सुरुवात केली होती. वयाचे 73 वे साल लागले तेही ओलांडले. कधी कल्पिले नव्हते एवढे मोठे काम परमेश्वराने आपल्या हातून करून घेतले आहे. आता त्यांच्या चरणावर जाऊन हे सारे त्याला अर्पण करावे अशी त्यांनी खूणगाठ बांधली आणि अशातच 2 डिसेंबर 2001 ला परमेश्वरात विलीन झाले. सारे आयुष्य अथक परिश्रमातून ज्ञानाची शिखरे उभविनारा हा कर्मवीर या दिवशी आपणा सर्वांना दुःख सागरात लोटून परमेश्वराच्या भेटीला गेला !
इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्त्व कमी होत नाही. नंदलाल पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अजरामर आहे आणि राहणार.
नंदलाल पाटील कापगते यांना 99 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
लेख
धनंजय तुमसरे सर
नं. पा. कापगते विद्यालय साकोली.
9404035033
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷