दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर 24 जानेवारी – दिव्यांग बांधवांना आपले कलागुण सादर करण्यास शहरातील सर्वात मोठे सभागृह महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले, यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही त्यामुळे मनपाने दरवर्षी पर्पल महोत्सवाचे आयोजन करून हा उपक्रम सुरु ठेवण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत, दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटी व पुनम प्रॉडक्शन यांच्या साहाय्याने दिव्यांग बांधवांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी गणतंत्र दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
शरीराने धडधाकट असणारे अनेक लोक मनाने समाधानी नसतात,मात्र दिव्यांग बांधवांना शरीराच्या सीमा असतांनाही जीवनावर प्रेम करतात,हे बोध घेण्यासारखे आहे.
चंद्रपूर शहरात १० बस स्टॅन्ड मनपाने तयार करावे ज्यात सोलर व्यवस्था असावी,महिलांसाठी प्रसाधन गृह असावे व ते दिव्यांग बांधवांस चालविण्यास देण्यात यावे. ज्यायोगे त्यांना रोजगार मिळेल यासाठी १ कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले.
तसेच दिव्यांग बांधवांच्या रोजगारासाठी इतरही प्रस्ताव मनपाने तयार करावे त्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. महाकाली महोत्सवातही दिव्यांग बांधवांना सादरीकरण करण्यास स्टेज उपलब्ध करून देणार असुन या माध्यमातुन त्यांचे कलागुण देशपातळीवर पोहोचण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोठ्या पातळीवर जर दिव्यांग बांधवांना संधी मिळत असेल तर उपलब्ध करून द्यावी त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
पालक सचिव श्री.संतोष कुमार :-
ज्या उत्साहाने दिव्यांग बांधवांनी आहे येथे नृत्य सादर केले त्यावरून त्यांना आपले कलागुण सादर करण्यास स्टेज मिळाल्याचा आनंद दिसुन येतो.चंद्रपूर मनपाने दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.पुढील वर्षी याहुन दुप्पट लोक कार्यक्रम सादर करण्यास व बघण्यास असतील अशी आशा व्यक्त करतो.
जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा :-
व्यक्त होण्यासाठी दिव्यांग बांधवांना स्टेज उपलब्ध करून त्यांना समाजाचा महत्वाचा घटक म्हणुन गौरवान्वित केल्याबद्दल चंद्रपूर मनपाचे अभिनंदन.पुढील वर्षी ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग बांधवांनी पर्पल उत्सवात सहभाग घेऊन आनंद घेण्याचे अपेक्षा व्यक्त करतो.
आयुक्त श्री. विपीन पालीवाल :-
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदा पर्पल महोत्सवाचे यशस्वी आयोजन मनपाने केले आहे. विशेष क्षमता असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पर्पल उत्सव ओळखला जातो.दिव्यांग मुलांच्या पालकांना आज नक्कीच आनंद होत असेल.उत्सवात दिव्यांग बांधवांसाठी लागणारी सर्व व्यवस्था कार्यक्रमात करण्यात आली होती. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मनपाचे धोरण आहे. असेच कार्यक्रम पुढेही आयोजित करण्याचा मनपाचा प्रयत्न राहील.
याप्रसंगी पालक सचिव संतोषकुमार,जिल्हाधिकारी विनय गौडा,आयुक्त विपीन पालीवाल, समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे,उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,अक्षय गडलिंग संतोष गर्गेलवार,समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, रफिक शेख,प्राचार्य डॉ.कापसे-गावंडे,निलेश पाझारे, रमेशकुमार बोरकुटे,अमोल शेंडे, दत्ताजी,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे,सुषमा करमनकर,रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन तसेच वॉर्ड सखी उपस्थीत होते.