बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
महायुती सरकारने गाईच्या दुधास प्रति लिटरला 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीच्या आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शुक्रवारी (दि.22) दिली. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी दूधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाची नियोजनबद्ध रित्या प्रगतीपथाकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याबद्दल गौरवोदगार काढले.
इंदापूर येथे दूधगंगा सहकारी संघाच्या कार्यालयामध्ये आयोजक पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी अनुदान वाढीसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांचा दूधगंगा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान करीत धन्यवाद व्यक्त केले. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, उपाध्यक्ष विक्रम कोरटकर, दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील, विलासराव वाघमोडे, शहाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादन शेतकऱ्यांना दि.1 जाने. पासून गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान रु. 34 एवढा दर मिळणार आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार गायीच्या 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ दुधाला रु.29 दर सहकारी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यानंतर सरकारच्या वतीने प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.
दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादन शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने मी व दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक राजवर्धन पाटील आंम्ही दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत 6 नोव्हेंबरला वेळ मागून भेट घेतली व निवेदन दिले. त्यानंतर विखे पाटील यांनी दुग्ध खात्याच्या अधिकाऱ्यांची अनुदाना संदर्भात बैठक घेतली. तसेच दि. 20 नोव्हेंबर रोजी पुन्हा भेट घेऊन शेतकऱ्यांना रु. 7 प्रति लिटर याप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी दि. 21 नोव्हें. रोजी सह्याद्री अतिथीगृहावर दूध दरवाढीवर चर्चा करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेतली. राज्यभरातून अनेक संघटनांनी गाईच्या दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये दूध व्यवसायाचा सिंहाचा वाटा आहे. मी अकलूजच्या शिवामृत संघाचा संचालक, पुणे जिल्हा दूध संघाचा (कात्रज)चा संचालक म्हणून काम करीत असताना दुग्ध व्यवसाय वाढीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केली. दूध धंद्यामध्ये सुशिक्षित युवक, महिला, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. दूधगंगा दूध संघामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला स्थिरता प्राप्त झाली.
मध्यंतरी दूध संघ अडचणीत आला होता. मात्र आता अमुल शी करार केल्याने दूध संघ वेगाने प्रगती करीत आहे. शेतकऱ्यांना दहा दिवसाला पेमेंट केली जात असून, महिन्याला 12 कोटी रुपयांचे दूध पेमेंट शेतकऱ्यांना दिले जात आहे. दूध संघाचे संकलन प्रतिदिनी 1 लाख लिटर झाले आहे, असे गौरवोद्गार ही हर्षवर्धन पाटील यांनी काढले. तालुक्याच्या विकासासाठी नेतृत्वाकडे दूरदृष्टी लागते. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात तालुक्यात एकही सहकारी संस्था निघाली नाही अथवा सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एकही काम झालेले नाही, अशी खंतही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
चौकट
दूधगंगा संघाकडून हर्षवर्धन पाटील व राजवर्धनदादांचा सत्कार!
राज्य शासनाकडे गेली दोन महिने दुधाला अनुदान द्यावे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने यश झाल्याबद्दल दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दूधगंगा दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.