प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सध्या स्थित चिमूर-कान्पा,चिमूर-वरोरा,चिमूर-हिंगणघाट,चिमूर-कोरा-गिरड,चिमूर-सिंदेवाही मार्गाने धावणाऱ्या चिमूर आगाराच्या बसेस अंतर्गत चालकांची खास्ता हालत झाली असून या मार्गावर जागोजागी असणाऱ्या खड्ड्यांमुळे बस चालवताना बस चालकांची बऱ्यापैकी दमछाक होऊ लागली आहे.
चिमूर येथील बस आगारातंर्गत एम.एच.३१,एफ.सी.३६९० क्रमांकाची बस चिमूर ते चंद्रपूर असा मार्गक्रमण करीत होती.चिमूर ते वरोरा ३५३ (ई) राष्ट्रीय महामार्गांतंर्गत दोन्ही तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या मौजा राळेगाव जवळ,एसटी महामंडळाचे चिमूर आगार बस चालक खड्डे चुकवित बस चालवित असतानाच बसने खड्ड्यांच्या झोक्यामुळे अचानक वळण घेतले व रस्त्याच्या बाजूला गेली.
मात्र,बस चालक सतर्क असल्यामुळे त्यांनी बस जागीच थांबवली आणि प्रवाशांचा जीव धोक्याबाहेर केला.
चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गांतंर्गत रस्ता मजबूतीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.मात्र सदर रस्त्याचे बांधकाम निधी अभावी संथपणे केल्या जात आहे.या रस्त्याच्या कामासाठी पुरेसा निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे या रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम जागोजागी रखडले आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी मातीची मलमपट्टी केली असून मातीच्या मलमपट्टीला जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.
मातीच्या मलमपट्टीमुळे चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गांतंर्गत अनेक अपघात झाले असताना या मार्गाचे मजबूतीकरण वेळेत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे पुरेसे लक्ष नाही असेच म्हणावे लागेल.
ज्या मार्गांनी चिमूर आगारातंर्गत एसटी बसेस धावतात त्या सर्व मार्गांची दैन्यावस्था झाली असल्यामुळे चिमूर आगारातील बस चालकास अनेक मार्गांनी बसेस नेतांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग व इतर मार्गांची खास्ता हालत असल्यामुळे बस चालवताना बस चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळत नसेल हे कशावरून?
सर्व चालकांना,प्रवाशांना सुरक्षित ठेवायचे असल्यास व विविध मार्गातंर्गत अपघात टाळायचे असल्यास राष्ट्रीय महामार्गाचे व राज्य महामार्गाचे काम करतांना राज्यकर्त्यांनी दक्ष व सतर्क असणे आवश्यक आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत तर राष्ट्रीय महामार्गांची व राज्य महामार्गाची कामे जागोजागी खंडित करुन ठेवण्यात आली आहेत.
रस्त्यांच्या कामांचे ठेके द्यायचे,माल कमवायचे व चूप बसायचे हे धोरण तर नाही ना?