प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात जिकडे-तिकडे दिनदहाडे व रात्रोच्या वेळेस मुरुमांचे व वाळूचे बेकायदेशीररित्या उत्खनन सर्रासपणे होत(सुरु) असताना या तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ कसे काय आहेत?हेच कळायला मार्ग नाही.
रस्त्यांची कामे असोत की खाजगी कामे असोत उत्खननाची परवानगी घेतल्याशिवाय मुरुम व वाळूचे उत्खनन करता येत नाही.असे असताना मौजा पारडपार-टिटवी-कन्हाळगाव ते महालगाव या मार्गाच्या कामासाठी,”एम.के.एस.कंपनी द्वारा,विना परवाना हजारो ब्रास मुरुम व माती अवैध उत्खननातंर्गत वापरली जात असल्याचे वास्तव प्रकरण आहे.
एम.के.एस.कंपनी स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या जवळच्या व्यक्तींची असल्याचे त्या कामावरील मजूरांचे म्हणणे आहे.मात्र,याबाबत वास्तविक माहिती चिमूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारीच देवू शकतात.
जांभुळघाट-भिसी राष्ट्रीय महामार्गांतंर्गत मौजा पारडपार फाटा ते टिटवी-कन्हाळगाव,महालगाव,रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम सुरु असताना बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी हे सदर कामाची दररोज देखरेख करतात.त्यांना सदर कंपनीचे कंत्राटदार हे अवैध उत्खननातंर्गत रस्ता मजबूतीकरणाच्या कामासाठी मुरुम वापरतात हे कसे काय दिसत नाही?
तद्वतच जांभुळघाट तलाठी साझातंर्गत मौजा पारडपार परिसरातून हजारो ब्रास मुरुमांचे अवैध उत्खनन होत असताना मौजा पारडपार व मौजा जांभुळघाट येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, पदाधिकाऱ्यांना,ग्रामसेवकांना,व तलाठ्यांना अवैध मुरुमाचे उत्खनन कसे काय लक्षात येत नाही हेच कळायला मार्ग नाही.
याचबरोबर चिमूर तहसील अन्वये मौजा जांभुळघाट तलाठी साझातंर्गत मौजा पारडपार हद्दीतील भुमापण क्रमांक २१५ या ठिकाणावरून मुरुम उत्खननाची परवानगी घेतली नसताना तेथून विनापरवानगी हजारो ब्रास मुरुमांचे अवैध उत्खनन एम.के.एस.कंपनीने रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी केले असतांना चिमूर तालुक्यातंर्गत संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी? यांना आणि इतर संबंधितांना सदरचे अवैध मुरुम उत्खनन का म्हणून नजरेस पडत नाही? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत वाळू व मुरुमाचे अवैध उत्खनन सर्रासपणे होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष,त्यांच्या कर्तव्यातंर्गत जाणिवपूर्वक कसूर करणारे आहे व हलगर्जीपणाने वागण्याचे त्यांची मनसूबे बाहेर पाडणारे आहेत हे लपून राहिलेले नाही.