दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात झाली असून राज्यभरातून लाखो भाविक आळंदी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
MIT कला,वाणिज्य व विज्ञान कॉलेज व आळंदी नगरपरिषद यांनी संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता अभियाना द्वारे ‘निर्मल कार्तिकी वारी‘ उपक्रमाची सुरुवात केली असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग,शिवसृष्टी परिसर, माऊली मंदिर परिसर,इंद्रायणी नदी घाट या भागा तील पडलेला कचरा गोळा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. साधारण 100 विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला असून कचरा संकलना बरोबरच त्यांनी इंद्रायणी नदी घाटावर जनजागृती पर पथनाट्य देखील सादर केले.
स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.बी.बी.वाफरे,अरविंद वागस्कर (एनएसएसअधिकारी),पद्मावती उंडाळे (विभाग प्रमुख कला,वाणिज्य) आणि विविध विभागांचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.
सदर स्वच्छता मोहिमेत डॉ.अनिल स्वामी,डॉ.राहुल खलाटे,प्रा.हनुमंत शिंगाडे, आळंदी नगरपरिषद मार्फत अर्जुन घोडे,वैशाली पाटील,निलेश चव्हाण उपस्थित होते.
समाधी सोहळ्यास होणारी लाखोंची गर्दी व तुलनेने आळंदी नगरपरिषद कडे असणारा अपुरा सफाई कर्मचारी वर्ग लक्षात घेता मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मागील आषाढी पासून ‘निर्मल वारी‘ उपक्रम अंतर्गत कॉलेज विद्यार्थ्यां ची “स्वच्छता वॉरियर्स” म्हणून नियुक्ती करण्याची व त्यांच्या मार्फत वारी काळात इंद्रायणी नदी घाटावरील तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील प्लास्टिक पिशव्या,बॉटल व इतर प्रकारचा कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
आषाढी यात्रेत एन.एस.एस विद्यार्थ्यांनी उत्तम काम केले असून संजीवन समाधी सोहळ्यात देखील स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतील असे मत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी व्यक्त केले.