श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदाच्या अखंड मंत्रोच्चारात सकाळी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला.

           सकाळी नऊच्या सुमारास माउलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्याु पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. मंदिराच्या सेवकांनी पायरी स्वच्छ केली. महाद्वारात पायरीपूजनासाठी भाविकांची गर्दी झाली. महाद्वारातून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला.

         पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला वारकऱ्यांचा माउली नामाचा अखंड हरीनामाचा जयघोष सुरु होता. गुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर माउलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर पालखीसोहळा मालक यांच्या वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.

            देऊळवाड्यातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली. विजय कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी यशोदीप जोशी आणि अमोल गांधी यांनी पौराहित्य केले.

          यावेळी पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, ऋषीकेश आरफळकर, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त डॉ.अभय टिळक, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस उपायुक्त राजेंद्र गौर, वरीष्ठ पो.नि.भिमाजी नरके, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, डी.डी.भोसले, राहुल चव्हाण, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर गुळूंजकर, विष्णू तापकीर, विठ्ठल घुंडरे, मच्छिंद्र शेंडे, अजित वडगावकर, तुकराम माने, श्रीधर सरनाईक, संकेत वाघमारे तसेच आळंदीकर ग्रामस्थ व भाविकभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

           हैबतबाबांच्या वतीने विश्वस्त आणि मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दुपारी माउलींच्या समाधीजवळ महानैवद्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी साडेसहा ते आठ वीणा मंडपात योगिराज ठाकूर आणि रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन, रात्री हैबतबाबा यांच्या पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्या वतीने जागरचा कार्यक्रम झाला. देवस्थानच्या वतीने कार्तिकी वारी काळात दर्शनाच्या रांगेतील भाविकांना कार्तिकी वद्य अष्टमीपासून अमावास्येपर्यंतच्या कालावधीत मोफत खिचडी आणि चहा वाटप केला जात आहे.