रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा
वणी: छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी महाराजांनीही पाचवेळा माफी मागितली, असे संदर्भहीन वक्तव्य करणाऱ्या भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याचा संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड वणी शाखेकडून जाहीर निषेध करण्यात आला. कोषारी आणि त्रिवेदी यांच्या पुतळ्यास जोडे मारून आपला संताप व्यक्त करत ही ब्याद महाराष्ट्रातून हद्दपार करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यपाल हे संवैधानिक पद असून अशा पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना कोषारीनी वारंवार महाराष्ट्रातील बहुजन महामानवांचा जाहीर कार्यक्रमात अपमान करताना दिसून आहेत. अशा बिनडोक आणि बेअक्कल लोकांना राज्याच्या प्रमुख पदी राहण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना त्वरित राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी कोषारी आणि त्रिवेदी या दोघांचाही प्रचंड घोषणा देऊन निषेध करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, संजय गोडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे, दत्ता डोहे यांनी यावेळी आपापली मनोगत व्यक्त केली. या निदर्शनाच्या निमित्ताने बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.