बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा भिमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याची गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.23) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नि-प्रदिपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, निरा भिमा कारखान्याचे गेली 23 वर्षांमध्ये या परिसराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. गत हंगामासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना रु.2500 प्रमाणे ऊस बिलाची सर्व रक्कम अदा केली आहे. कारखान्याच्या देय एफ.आर.पी.पेक्षा सदरची रक्कम रु. 213 एवढी जास्त आहे. आगामी गळीत हंगामात साखर उतारा वाढीसाठी शेती विभागाने ऊस तोडणीचे योग्य नियोजन करावे. आगामी गळीत हंगामासाठी काटा पेमेंट करण्याचे नियोजन आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक पगार बोनस दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले.
प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. तर प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक हरिदास घोगरे व वृंदावना घोगरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार या संचालकांसह देवराज जाधव, सुरेश मेहेर आदी मान्यवर तसेच अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी तर आभार उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले.