पर्यावरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जात असते. याचा परिणाम नदीतील जीवांवर होत असून या रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले आहेत.

नदी पात्रातील लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. 

             शहरांजवळून गेलेल्या नदींमध्ये कंपन्यांचे पाणी सोडले जात असते. यामुळे अनेकदा नदीतील जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आले आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी पात्रावरील केजूबाई बंधाऱ्याजवळ यापूर्वी देखील लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील मुळा नदी पात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. 

महापालिकेचा निष्काळजीपणा 

           महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे पर्यावरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे काही खासगी कंपन्या मुळा नदीपात्रामध्ये रसायन मिश्रीत पाणी सोडत आहेत. त्यामुळे मुळा नदीपात्रातील जलचर जीवन धोक्यात आले आहे.

         एमपीसीबी बोर्डाच्या अध्यक्षांना मर्सिडीज कंपनीचे प्रदूषित पाणी दिसते. मात्र मुळा, पवना आणि (Indrayani River) इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी का दिसत नाही? असा सवाल पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.