ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली:दी.२२_
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाच पाहिजे असा अट्टहास धरणारे खूप थोडे असतात. पण आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित आहेत आणि असतात. कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणारेही अगणित आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरते. आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते. विद्यार्थी जेव्हा मोठे होतात, ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवतात त्यापेक्षाही महत्त्वाचे ते ‘आदर्श नागरिक’ बनतात. तीच खरी शिक्षकांसाठी पावती असते.
शिक्षकाच्या कार्यासाठी हाच खरा पुरस्कार असतो. मोठ्यामोठ्या संस्थांमधील जागृत पालकांकडून विद्यार्थी निम्मा घरीच घडविला जातो. पुढील काम शिक्षक करतात. पण कामगार वस्तीतल्या संस्था, शाळांमधून मात्र शिक्षकांचा खरा कस लागतो. या सर्वांवर मात करून हे शिक्षक ‘माणूस’ घडवितात. आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांच्या त्या जिद्दीला, चिकाटीला मानलेच पाहिजे. असे प्रतिपादन आमदार गजबे यांनी केले.
गडचिरोली येथील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम तथा इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुशी सिंह व मान्यवर उपस्थित होते.