बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यामध्ये बुधवारी (दि.21) विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये एकूण 661 बाटल्या रक्त जमा करण्यात आले. दरम्यान, वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक करीत धन्यवाद दिले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 361 बाटल्या रक्त जमा करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लालासाहेब पवार, भाग्यश्री पाटील, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आदी उपस्थित होते. येथे सकाळी 9 वा. पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान सुरू होते. या रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक (हडपसर) पुणे यांचे सहकार्य लाभले.
महात्मा फुलेनगर (बिजवडी)येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घघाटन संचालक छगनराव भोंगळे, सतीश व्यवहारे, अंबादास शिंगाडे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी 238 बाटल्या रक्त गोळा करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांचे सहकार्य लाभले.
तसेच हिंगणगाव येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजय देवकर, प्रा.राम आसबे व सहकाऱ्यांनी आसबेवस्ती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 61 युवकांनी रक्तदान करून हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
चौकट
रक्तदान लोक चळवळ व्हावी – हर्षवर्धन पाटील
राज्यामध्ये सातत्याने रक्ताची टंचाई रुग्णांसाठी जाणवत आहे. त्यासाठी रक्तदान शिबिरांची गरज आहे. आपल्या रक्तदानामुळे एकादा जीव वाचत असतो, त्यामुळे रक्तदान करणे हे पुण्य देणारे कार्य आहे. रक्तदान ही लोक चळवळ बनली पाहिजे, असे मत हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी नीरा भिमा कारखाना येथे रक्तदान शिबिराच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.