दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात. पण, यंदा परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता, दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे, असे मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले आहे.
का बदलण्यात आली वेळ..?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक गेली काही दशके रात्री निघते. लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर दगडूशेठ गणपती या मिरवणुकीत सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागीलवर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले.भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी जाहीर केले.
मिरवणुकीला होणाऱ्या विलंबामुळे बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला न होता, पितृ पंधरवडा सुरू झाल्यावर होते. ही गोष्ट गेल्या वर्षी प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे, असं हेमंत रासने यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच चार वाजता बेलबाग चौकातून मार्ग द्यावा. मानाचे गणपती, त्यानंतर महापालिका सेवक मंडळ आणि त्वष्टा कासार मंडळाचा गणपती मार्गस्थ होतो. त्यानंतर दगडूशेठ गणपतीला स्थान द्यावे, अशी मागणी ट्रस्टकडून यावेळी करण्यात आली.