ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील संघर्ष नगरातील २० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणावर दैनंदिन जीवनोपयोगी साहित्याची नुकसान झालेली आहे.
लांझेडा लगतच्या या संघर्ष नगरात पाणी शिरुन नागरिकांचे मोठे नुकसान होवूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी सोमवारी या नगराला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही विदारक परिस्थिती उघडकीस आली.
मागील वीस वर्षांपासून संघर्ष नगरात नगर परिषद प्रशासनाने रस्ते, पिण्याचे पाणी अशा कोणत्याही पायाभूत सुविधा न पुरविल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने करून पंचनामे करून शासन नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी.
तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषदेकडून पिण्याचे स्वच्छ पाणी आणि रस्ते व नाल्यांची स्वच्छता व डागडुजी तातडीने होण्याची आवश्यकता असल्याने संबंधितांना आदेश देण्याची मागणी जयश्री जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.