युवराज डोंगरे/खल्लार
मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळून दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या एका २१ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रोजी दुपारी घडली. रोशनी नरेश मंडवे वय 21रा.बुधवारा, अंजनगाव सुर्जी असे मृतक महीलेचे नाव असून नरेश दादाराव मंडवे वय26 रा.बुधवारा अंजनगाव आणि रेश्मा आनंद इगंळे वय 19 रा.विठ्ठल नगर अंजनगाव हे गंभीर जखमी झाले आहेत.नरेश मंडवे हे पत्नी रोशनी आणि नातेवाईक असलेली रेश्मा इगंळे यांचे सह ऍक्टिवा दुचाकी क्रमांक एम.एच.27-बि.सी.7074 ने दर्यापूर वरून अजंगावकडे जात असताना तामसवाडी ते कोकर्डा फाट्या दरम्यान दुपारी २ च्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट झाला. त्याचवेळी दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या नरेश मंडवे, रोशनी मंडवे आणि रेश्मा इगंळे यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत रोशनी मंडवे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेश्मा आनंद इंगळे, नरेश दादाराव मडवे, हे दोघेजण गंभीर जखमी झाले, जखमी दोघांना उपचारासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. यावेळी विजेचा प्रचंड आवाज झाल्याने आजुबाजुला असलेल्या इतर व्यक्ती भयभीत झाल्या होत्या. वीज कोसळून शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याने अंजनगाव तालुका बुधावाऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट, अजय देशमुख, राहुल भूंबर, सचिन शेलारे, अतुल सगणे, शरद गावंडे, पंकज ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.रहीणापुर चिंचोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन इगंळे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.