सावली (सुधाकर दुधे)
कमी पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती सावली येथे आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्या वतीने रेन वॉटर हॉर्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. याच प्रकल्पाचा शुभारंभ पंचायत समिती सावली येथील गट विकास अधिकारी मा.सौ.सुनिता मरस्कोल्हे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. रेन वॉटर हॉर्वेस्टिंग प्रकल्पामुळे पाणी जमिनीत मुरविले जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती इमारतीस हा पहिलाच प्रकल्प आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. एकतर भुगर्भातील पाण्याचा उपसा हा अधिक प्रमाणात होतो, परंतु त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी इमारतीच्या छतावरील वाहून जाणारे पाणी जलवहिनीद्वारे कुपनलिकेत जाणार आहे. अश्या प्रकारे पावसाच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग करण्यात येणार आहे. या रेन वॉटर हॉर्वेस्टिंग प्रकल्पामुळे भविष्यात परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. आजच्या या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सावली येथील गट विकास अधिकारी मा.सौ.सुनीता मरस्कोल्हे मॅडम होत्या, तसेच मा.श्री.संजीव देवतळे विस्तार अधिकारी, मा.श्री.अनिल उमाटे सहाय्यक लेखाधिकारी, इंजिनिअर अनिकेत रामटेके, करण बोरकर, आयसीआयसीआय फाऊंडेशन विकास अधिकारी मयुर येवला, समन्वयक मंगेश राजुरकर उपस्थित होते.